EVM मशीन ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा, वापरावर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 09:45 AM2019-03-20T09:45:56+5:302019-03-20T11:32:53+5:30
लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रिडा संकुलाचा ताबा घेण्यात आला आहे.
डोंबिवली - लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रिडा संकुलाचा ताबा घेण्यात आला आहे. या ठिकाणी EVM मशीन ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. अन्य पर्याय उपलब्ध असताना क्रिडासंकुलाचा अट्टाहास का? असा सवाल खेळाडूंनी केला आहे. दरम्यान आयोगाच्या या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी क्रिडासंकुलाच्या आवारात आज सकाळी प्रतिकात्मक आंदोलन छेडले.
कल्याण लोकसभेचे मतदान 29 एप्रिलला होणार आहे. तत्पुर्वी निवडणूक यंत्रणेचे कामकाज जोमाने सुरू झाले असून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा घेण्यात आला आहे. ताबा घेण्यापूर्वी क्रिडासंकुलातील व्यायामशाळा व जलतरण तलाव बंद करून मुलांच्या खेळावर टाच आणू नये असे पत्र शिवसेनेचे कल्याण ग्रामीण व पूर्व विधानसभा क्षेत्र संघटक कैलास शिंदे यांनी निवडणुक विभागाला दिले होते तसेच केडीएमसीचे सभागृहनेते श्रेयस समेळ यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून तरण तलावाची जागा देऊ नका असे स्पष्ट केले होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनीही नाराजी व्यक्त केली होती. परंतू जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रनुसार महापालिका प्रशासनाने जागेचा ताबा निवडणुक विभागाकडे दिला आहे. दरम्यान याचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी प्रतिकात्मक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदनही देण्यात आले होते. निवडणूक आयोगाचा निर्णय जैसे थे राहील्याने आज सकाळी क्रिडासंकुलात आयोगाच्या कारभाराचा निषेधार्थ व्यायामपटूंनी व्यायाम करून प्रतिकात्मक आंदोलन छेडले. यामध्ये मोठया संख्यने व्यायामपटू सहभागी झाले होते.
क्रिडा संकुलातील तरणतलावाचा उपभोग घेणारे 630 आसपास आजीवन सदस्य आहेत. व्यायामशाळेचा देखील मोठया प्रमाणावर वापर होतो. तर आता उन्हाळी सुट्टीचा मोसम सुरू होणार असल्याने याठिकाणी येणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे. परिक्षा संपल्यानंतर मुले सुट्टीमध्ये खेळासाठी देखील या क्रिडासंकुलाचा वापर करतात. परंतू निवडणुकीने ताबा घेतल्याने त्यांच्या खेळावर विरजण पडणार आहे. हे टाळण्याकरीता व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटयगृह घेतल्यास सर्व बाजूने सोयीस्कर होईल याकडे व्यायामपटूंनी लक्ष वेधले होते.
आम्ही आजीवन सदस्य आहोत मग निवडणुकीच्या काळात जी आमची गैरसोय होणार आहे त्याचे पैसे केडीएमसी परत देणार आहे का? असा सवाल व्यायामपटूंनी केला आहे. आयोगाच्या कारभाराचा निषेध म्हणून निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. याबाबतचे जाहीर फलक बाजुकडील घरडा सर्कल परिसरात व्यायामपटूंकडून लावण्यात आले आहेत.