Lok Sabha Election 2019: भिवंडी मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये लॉबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:57 AM2019-03-13T00:57:17+5:302019-03-13T00:57:34+5:30
लोकसभा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
भिवंडी : लोकसभा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वपक्षाकडून तिकीट मिळण्याची शाश्वती नसलेल्या उमेदवारांनी इतर पक्षांकडे तिकिटासाठी चाचपणी सुरू केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यासमोर तोडीचा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीने सक्षम आणि लोकप्रिय उमेदवाराचा पक्षाकडून शोध सुरु आहे; मात्र मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील काँग्रेस उमेदवार आयात करते की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहे.
माजी खासदार, तथा काँग्रेसचे ठाणे ग्रामिण जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडले आहे. काही भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील काँग्रेस नेत्यांशी थेट संपर्क साधून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शहर व ग्रामिण भागातील पक्ष कार्यकर्त्यांचे काँग्रेसच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपील पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मोहीम सुरू केली असून ते खुलेआम आपली मते प्रदर्शीत करू लागली आहेत. त्यामुळे भाजपाविरोधात शिवसेनेने भिवंडी तालुक्यात बंडाचे वातावरण निर्माण केले आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी थेट काँग्रेस नेत्यांशी संधान बांधल्याचे समजते. भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस व शिवसेना युतीची सत्ता आहे. याचा फायदादेखील काँग्रेसचे तिकीट घेणाºया शिवसेना नेत्यांना होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची परिस्थिती पाहता, या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी महानगरपालिकेचे काही नगरसेवक व पदाधिकाºयांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे आग्रह धरला असून, त्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये दोन दिवसांपासून ठाण मांडले आहे. टावरे यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचा धोका ओळखून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाधिकाºयांची गेल्या आठवड्यात बैठक घेऊन त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. भाजपामध्ये विद्यमान खासदार कपील पाटील यांच्यासाठी भाजपातील एका गटाकडून पक्षश्रेष्ठींकडे आग्रह सुरु आहे. त्यामुळे पाटील विरोधकांची गोची झाली आहे़
भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी मुंबई भाजपा कार्यालयात पहिल्या फळीच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. त्यामध्ये उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी भाजपातून कपील पाटील यांच्यासह ग्रामिण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे रिंगणात आहेत. या मतदारसंघात नेहमी जातीय राजकारण होत असून, कुणबी सेनासुध्दा आक्रमक झाली आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी न दिल्यास वेगळी वाट धरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी उशिरा जाहिर होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ््यात माळ घालणारे हे औत्सुक्याचे आहे.