‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
By संदीप प्रधान | Published: April 30, 2024 04:52 AM2024-04-30T04:52:36+5:302024-04-30T04:53:32+5:30
भाजपने अगदी सुरुवातीपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ आपण लढवणार, असे वातावरण निर्माण केले.
संदीप प्रधान
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे प्रतिष्ठेची जागा आहे. नेमके हे हेरुन भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि दक्षिण मुंबई हे तीन मतदारसंघ पदरात पाडून घेतले आहेत. ठाण्यातील निवडणुकीत शिंदेसेनेला कसे व किती यश मिळते, यावर भाजपचे विधानसभा निवडणुकीतील डावपेच अवलंबून राहतील.
भाजपने अगदी सुरुवातीपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ आपण लढवणार, असे वातावरण निर्माण केले. त्याचवेळी शिंदेसेनेच्या काही मातब्बर उमेदवारांचे तिकीट कापायला भाग पाडून दबावतंत्राचे राजकारण सुरू केले. मुख्यमंत्रिपद शिंदेसेनेकडे असताना जर ठाणे मतदारसंघ गमावला तर शिवसैनिकांत अत्यंत विपरित संदेश जाईल, या कल्पनेने शिंदेसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे शिंदे यांनीही खेळी केली. त्यांनी कल्याणमधून आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली नाही. जोपर्यंत ठाण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कल्याणचा उमेदवार जाहीर होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शिंदे यांच्या या खेळीला छेद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत यांची उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली.
ठाण्यावरील दावा भक्कम करायचा व त्या बदल्यात एकेक मतदारसंघ काढून घ्यायचा, असे भाजपचे डावपेच सुरू होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे लढण्यास उत्सुक होते. मात्र, भाजपला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा होता. तो मिळवण्यात भाजप यशस्वी झाला. पालघर मतदारसंघातील राजेंद्र गावित यांनी मागील वेळी शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवायचे आहे. पालघर हाही भाजपच्या पदरात येणार आहे. दक्षिण मुंबईवरून भाजप व शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अथवा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडवून घेण्यात भाजप जवळपास यशस्वी झाला आहे. ठाण्याची जागा प्रतिष्ठेची केली नसती तर हे मतदारसंघ मिळाले नसते, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.
विधानसभेची गणिते
ठाण्यात शिंदेसेनेच्या चिन्हावर निवडणूक होणे, ही भाजपचीही गरज आहे. शिंदेसेनेला कसे यश लाभते, यावर विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा निर्णय अवलंबून राहील. भाजपने ठाणे खेचून घेतले असते व शिवसेनेचे चिन्ह नाही म्हणून शिवसैनिकांची मते उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे गेली तर शिंदेसेना त्याचेच भांडवल करेल, याची भाजपला कल्पना आहे. भविष्यात विधानसभा व महापालिका निवडणुकीपासून भाजप आपली मांड पक्की करणार असल्याचेही भाजपच्या नेत्याने स्पष्ट केले.