Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 03:13 PM2024-05-06T15:13:43+5:302024-05-06T15:16:39+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आहेत. ठाण्यात महायुतीने शिवसेनेच्या नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आहेत. ठाण्यात महायुतीने शिवसेनेच्या नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आज प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राजन विचारे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच धर्मवीर चित्रपटात राजन विचारे यांच्याबाबत दाखवलेल्या घटनांबाबतही भाष्य केले आहे.
"धर्मवीर चित्रपटात राजन विचारे यांच्याबाबत दाखवलेले सर्व खोटं आहे, दुसऱ्या चित्रपटाच आम्ही सर्व खरं दाखवणार आहे. त्यांना दिघे साहेबांनी राजीनामा द्यायला सांगितलं होतं पण, त्यांनी दिला नाही. ते रघुनाथ मोरे यांच्याकडे गेले मोरे साहेबांनी त्यांना समजावून ,सांगितलं. पण, त्यावेळी ते दिघे साहेबांनाही काहीही बोलले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, त्यावेळी मी दिघे साहेबांना मला पद नको म्हणून सांगितलं. दिघे साहेबांनी त्यांना नंतर बोलावून समजावून सांगितलं आणि राजीनामा द्यायला लावला. ते दिघे साहेबांचे नकली शिष्य आहेत. असली शिष्य नरेश मस्के आहेत, असंही शिंदे म्हणाले.
दिघेंकडून ठाणे जिल्हाप्रमुखपद काढून घेण्याचा डाव होता
"दिघे साहेब देव माणूस होते,त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांना राजीनामा द्या म्हणून फर्मान आलं होतं. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर पद काढून घ्या म्हणून सांगितलं तर त्यांना काय वाटेल. नंतर त्यांना कुणीतर सांगितलं की दिघे साहेबांचं पद काढून घेतलं तर ठाणे, पालघर जिल्ह्यात कोणच राहणार नाही सगळे दिघे साहेबांसोबत जातील मग ते थांबले, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे यांनी केला.
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नेते पदासाठी जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंचं नाव पुढे केले, राज ठाकरे यांनी फार मेहनत घेतली असून त्यांच्या नावाचा विचार व्हावा असं म्हटलं होते. त्यानंतर फटाफट दिघेसाहेबांना फोन आले, त्यानंतर दिघेसाहेब गाडीत बसून निघून गेले आणि पुढील २ दिवस ते कुणालाही भेटले नाहीत. एवढा त्यांना मानसिक त्रास झाला, त्यामागे कोण होते? दिघेसाहेब गेल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा मला काय प्रश्न विचारावा, ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?, फकीर माणूस, दोन्ही हाताने सर्व वाटणारा माणूस, ज्या माणसाने शाखेत आयुष्य काढले, ना घर, ना बिल्डिंग असं मी म्हटलं. त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आहे असं मला वाटलं. परंतु नाईलाजास्तव काम करावं लागले असं त्यांनी म्हटलं.