भिवंडीत कपिल पाटील चिडले; बोगस मतदान होत असल्याचा केला आरोप
By नितीन पंडित | Published: May 20, 2024 06:54 PM2024-05-20T18:54:50+5:302024-05-20T18:55:45+5:30
तर पाटील नागरिकांना धमकावत असल्याचा बाळ्या मामांचा आरोप
नितीन पंडित
भिवंडी: शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागला आहे. खंडूपाडा बाला कंपाउंड मिल्लत नगर येथील अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मतदान केंद्रावर कपिल पाटील प्रचंड चिडलेले दिसले या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
यावेळी पाटील यांनी निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा यांना धारेवर धरत मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्यासाठी मागणी करीत या भागातील मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली. या वेळी अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी कपिल पाटील यांनी केल्या असून काही ठिकाणी बोटावरील शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन बसल्याचे दिसून आल्याचा आरोप करीत लोकशाही वाचवायला निघालेले लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
तर सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी दाखवलेला उत्साह ही विजयाची नांदी असून कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी दुपारी आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे त्याचे खोटे आरोप करून मतदान जाणून-बुजून बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांना धमकावलं त्यांनीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या केली असून आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढत असल्याचे प्रत्युत्तर महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिले आहे.