आधी 'हम आपके है कौन', पण आता पाटील-कथोरे म्हणतात ‘हम साथ साथ है’!
By पंकज पाटील | Published: March 19, 2024 09:32 AM2024-03-19T09:32:01+5:302024-03-19T09:33:12+5:30
गेले काही महिने किसन कथोरे आणि कपिल पाटील परस्परांमधील वादांमुळे आले होते चर्चेत
पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : गेले काही महिने परस्परांमधील वादांमुळे चर्चेत आलेले आमदार किसन कथोरे यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली. निवडणुकांच्या पूर्वी ‘हम आपके है कौन’ अशी भूमिका घेणारे पाटील-कथोरे आता निवडणुका लागल्यानंतर ‘हम साथ साथ है’ची ग्वाही देत असल्याने भाजपची चिंता कमी झाली.
गेल्या दीड वर्षांपासून आ. कथोरे आणि राज्यमंत्री पाटील यांच्यातील राजकीय वाद सर्वांच्या चर्चेचा विषय होता. या दोन बड्या लोकप्रतिनिधींत समेट घडवण्याचा प्रयत्न खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. मात्र तो अवघा दीड महिनाच टिकला. मुरबाड मतदारसंघात निवडणुकीदरम्यान राजकीय खेळी करताना पाटील आणि कथोरे यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपर्यंत हे दोन्ही नेते एकमेकांना पाण्यात बघत होते. मात्र लोकसभा निवडणुका लागल्यानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याने आता या दोन लोकप्रतिनिधींमध्ये समेट झाला. पाटील यांनी कथोरे यांचे निवासस्थान गाठून राजकीय विषयांवर चर्चा केली. दोन बडे लोकप्रतिनिधी एकत्रित आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र हा राजकीय समेट केवळ निवडणुकीपुरता आहे, की कायमचा याची चर्चा रंगू लागली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड आणि शहापूर विधानसभा क्षेत्रात आ. कथोरे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कथोरेंची नाराजी पाटील यांना त्रासदायक होऊ नये यासाठीच हा समेट झाला आहे. भाजपतील शिस्त लक्षात घेऊन आ. कथोरे यांना कोणतेही चुकीचे पाऊल उचलता येणार नाही. इच्छा असो वा नसो मात्र भाजपचा उमेदवार म्हणून कथोरे यांना कपिल पाटील यांचा प्रचार करावाच लागणार आहे.