...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 11:40 AM2024-05-08T11:40:24+5:302024-05-08T11:49:53+5:30
Lok Sabha Election 2024 :आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभेसाठी काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्या. आता १३ मे रोजी चौथा आणि २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दोन्ही टप्प्यासाठी आता प्रचारसभा सुरू आहेत. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
खासदार संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. ४ जूननंतर तुम्हाला खरा नेता कोण आणि शिवसेना खरी कोणाची हे जनता सांगेल. दोन दिवस मी पाहतोय मुख्यमंत्री कुठे आहेत. ते सध्या पैसे वाटत फिरत आहेत. कोल्हापूरातील शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी कोट्यवधी रूपये घेऊन हॉटेलमध्ये बसले होते. यांच्याकडे चोरीच्या पैशाशिवाय काहीच नाही. हे आता ५०, ५० कोटी रुपये आमदारांना देतात. ठाण्यातील निवडणूक रंगतदार आहे. राजन तुम्ही जास्त फिरु नका, शाखेत बसून राहीला तरीही लोक तुम्हाला मतदान देणार आहेत. लोक मतदानाची वाट बघत आहेत, यांचे इतिहासातून नामोनिशाण संपणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र चालवणार आहेत का? महाराष्ट्रावर एवढे वाईट दिवस अजून आलेले नाहीत. महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. आजही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतो. आजही बाळासाहेबांनंतर शरद पवारांसारखा खंबीर नेता उभा आहे. आम्ही सगळे एका ताकदीने एकवटलो आहोत. महाराष्ट्रातील हजारो, लाखो लोक उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी असतात. एकनाथ शिंदे हे प्रकरण ४ जूनला संपेल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट
"हे कसले शिवसैनिक यांच्यासारखे डरपोक आम्ही पाहिले नाहीत. याला मी साक्षीदार आहे, आम्ही अयोध्येत गेलो तेव्हा हे महाशय माझ्या खोलीत आले आणि म्हणाले काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ते म्हणाले हे आमचं वय तुरुंगात जायचं वय नाही. काहीतरी करा, आपण मोदींसोबत गेलं पाहिजे. मी म्हणालो आपलं चांगलं सुरू आहे, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री आहेत. आता तुम्ही म्हणता निर्णय बदलायला पाहिजे पण कशाकरता? यावर ते म्हणाले, मला आता तुरुंगात जायची इच्छा नाही, असा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केला.
"हे महाशय ईडीला घाबरुन पळून गेले आहेत. विचार, विष्ठा,नैतिकता काही नाही. शिवसेनेच्या नावावर कोट्यवधी कमावले, लूट केली आता त्या लुटीला संरक्षण हव आहे म्हणून तिकडे गेलात. आपल्यासोबत ४० लोकांना घेऊन गेलात. तुम्ही कोणत्या तोंडाने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना दाखवणार आहात एवढंच मला विचारायचं आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. आनंद दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही, त्यांनी ठाण्याची एक पिढी घडवली. आनंद दिघेंना तुम्ही तोंड दाखवणार आहात का? त्यांनी दिघे साहेबांचा खोटा सिनेमा काढला, हा दिघे साहेबांचा अपमान आहे, असंही संजय राऊत म्हणाले. हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत. दोन ठिकाणी प्रचाराची गरज नाही. ही ठिकाणे म्हणजे ठाणे आणि बारामती, असंही राऊत म्हणाले.