एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात; जेष्ठ नागरिकांची झाली कसरत
By अजित मांडके | Published: May 20, 2024 01:16 PM2024-05-20T13:16:47+5:302024-05-20T13:17:51+5:30
ठाणे लोकसभा मतदार संघात सकाळपासून सुरळीत मतदान सुरू होते.
अजित मांडके,ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघात सकाळपासून सुरळीत मतदान सुरू होते. मात्र, अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात आल्याचे दिसून आले. त्यात अनेक जेष्ठ नागरिकांची पुरते हाल झाल्याचे दिसून आले.
ठाण्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र, घोडबंदर असेल येऊर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, शास्त्री नगर आदी सह शहरातील भागात अनेक नागरिकांच्या एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्याचे दिसून आले. येऊर गावातील मतदारांची नावे खालील बाजूस म्हणजेच शास्त्री नगर भागात आली होती. तर एक सदस्य येऊर मध्ये तर कुटुंबातील दुसरा सदस्य शास्त्री नगर भागात असा काही प्रकार दिसून आला. तर घोडबंदर भागात एका 74 वर्षीय दीपक कुळकर्णी यांचे नाव वाघबील गावात आले होते तर त्यांच्या पत्नी स्मिता यांचे नाव 2 किलोमीटर लांब असलेल्या शाळेत आले होते. या घोळामुळे आमचे हाल झाल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे लोकमान्य नगर भागातील माजी नगरसेवक हणमंत जगदाळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांची नावे एका केंद्रावर तर सुनेचे नाव पाडा नंबर 4 मध्ये आणि मुलीचे नाव परेरा नगर येथे आले होते. घराचा पत्ता एक असताना घरातील सदस्यांची नावे लोकमान्य नगर भागातील चार दिशेला आले होते. त्यामुळे आमची देखील प्रचंड कसरत झाल्याचे जगदाळे यांनी सांगितले. त्या मुळे निवडणूक विभागाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.