मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत तू तू मैं मैं; ठाणे लोकसभा उमेदवारीवरून टीकेचे बाण
By धीरज परब | Published: March 22, 2024 10:51 AM2024-03-22T10:51:07+5:302024-03-22T10:51:27+5:30
Lok Sabha Election 2024 Thane: एक वादग्रस्त व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःलाच भाजप असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप करत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी उघड भूमिका मीरा-भाईंदर भाजपमधील एका गटाने घेतली आहे. त्यावरून युतीच्या उमेदवाराचा विरोध म्हणजेच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची हॅट्ट्रिक करण्यास विरोध, अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे. ठाणे लोकसभा कोणाकडे असावा, यावरून भाजप-शिंटे गटात मीरा-भाईंदरमध्ये तू तू मैं मैं सुरू आहे.
एक वादग्रस्त व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःलाच भाजप असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप करत असल्याचा आरोपही शिंदे गटाने केला आहे. आ. प्रताप सरनाईक, माजी आ. रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना शिंदे गटातून लोकसभेसाठी नावे चर्चेत आहे. मात्र मीरा-भाईंदरचे भाजपचे माजी आ. नरेंद्र मेहता यांनी आ. सरनाईक यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे मतदारसंघ भाजपला मिळायला हवा व शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे मेहता यांचे समर्थक मानले जाणारे भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मात्र पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान व्हावेत ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असून, कार्यकर्ते युतीचे काम करत आहेत, असे म्हटले आहे. पक्षश्रेष्ठी भाजप किंवा युतीचा जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याचे काम कार्यकर्ते करतील, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटाचे मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रमप्रताप सिंह यांनी सांगितले की, नरेंद्र मेहतांना देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत, अशी इच्छा नसावी, म्हणूनच ते युतीच्या उमेदवारास विरोध करत आहेत.
कार्यकर्ते युतीचा धर्म पाळणार
- भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार भाजप कार्यकर्ते काम करतील, असे भाजपचे मीरा- भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड. रवी व्यास यांनी सांगितले.
- भाजप व युतीचे कार्यकर्ते पक्षादेशानुसार ठाणे लोकसभेच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्यामुळे कोणी भाजप किंवा युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर कार्यकर्ते त्यांना ओळखून आहेत, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.