ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले
By अजित मांडके | Published: April 19, 2024 06:39 PM2024-04-19T18:39:01+5:302024-04-19T18:40:42+5:30
Lok Sabha Election 2024 : ठाण्याचा जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
ठाणे : ठाण्याचा जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तसेच आम्हाला मोदी यांना पंतप्रधान करायचे असेल किंवा ४०० पार करायचे असेल आणि इथे ४५ पार करायचे असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शुक्रवारी शिवसेनेच्या नेतेमंडळींची चर्चा पार पडली. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना, गोगावले यांनी ठाण्याच्या तिढ्याबाबत विश्वास व्यक्त केला. तसेच रत्नागिरीची जागा आम्ही सोडायला तयार नव्हतो. पण आम्ही सोडून राणे यांचा उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या प्रचाराला पण लागलो असे त्यांनी सांगितले.
नाशिक येथे आमचा सिटिंग खासदार म्हणून ती जागा शिवसेनेची होती. त्याचप्रमाणे ती आम्हाला मिळावी आणि तिथे आमचा उमेदवार असावा असे वाटते. आता नाशिकची उमेदवारी नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते की खासदार हेंमत गोडसे यांना मिळणार याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असे तिघे निर्णय घेतील असेही ते म्हणाले. याशिवाय माघार घेणारे भुजबळ काम करतील का असा सवाल उपस्थित केल्यावर आमच्या इथे तटकरे यांची सीट आहे. आम्ही पण एक पाऊल पुढे टाकून करतोय ना त्यांचे काम. आता सुनेत्राताई पवार यांच्या प्रचाराला आम्ही तिथेही गेलो होतो, तसेच शिवाजी आढळराव पाटील त्यांच्याही प्रचाराला गेलो होतो. जिथे त्यांना आमची आवश्यकता आहे. तिथे आम्ही जातोय जिथे आम्हाला आवश्यकता तिथे त्यांनी यावे. तरच, राज्यात ४५ जागांचा आकडा आम्ही पार करू शकतो. असेही गोगावले यांनी सांगितले.