ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:31 AM2024-05-02T05:31:23+5:302024-05-02T05:32:34+5:30
१९८९ आणि १९९१ असे सलग दोन वेळा भाजपचे रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरश: खेचून आणला.
ठाणे : ठाणे लोकसभेत ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे दोन शिवसैनिक व दोन माजी महापौर एकमेकांसमोर यावेळी उभे ठाकले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये देखील दोन माजी महापौर आमनेसामने निवडणूक रिंगणात उतरले होते. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दिघे यांनी खेचून आणलेला मतदारसंघ कोण राखणार ? असा प्रश्न यानिमित्ताने ठाणेकरांपुढे आहे.
१९८९ आणि १९९१ असे सलग दोन वेळा भाजपचे रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरश: खेचून आणला. त्यानंतर आतापर्यंतच्या निवडणुकीत एकदा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. २००९ साली डॉ. संजीव नाईक खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्यानंतर दोन वेळा तो मतदारसंघ राखण्यात शिवसेनेला यश आले. १९९६ ते २००४ असे चार वेळा दिवंगत प्रकाश परांजपे खासदार झाले. २००८ साली आनंद परांजपे खासदार झाले होते. यंदा उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात लढत होणार आहे.
यापूर्वीही झाली दोन माजी महापौरांची लढत
यंदा ठाण्याच्या दोन माजी महापौरांमध्ये ठाणे लोकसभेसाठी लढत होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत ठाणे लोकसभेसाठी ठाणे आणि नवी मुंबईच्या माजी महापौरांमध्ये (राजन विचारे व संजीव नाईक) लढत झाली होती. त्यावेळी विचारे हे निवडून आले होते. मात्र ती लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी होती.