ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
By अजित मांडके | Published: April 29, 2024 02:38 AM2024-04-29T02:38:14+5:302024-04-29T02:40:13+5:30
दोन्हीपैकी कोणत्या सेनेला ही मते जाणार यावर तर्कवितर्क
अजित मांडके
ठाणे : ठाणे मतदारसंघात मनसेच्या असलेल्या पावणे दोन लाख मतांची ताकद महायुतीच्या पाठीशी उभी राहावी याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्याची गळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना घालतील. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मागील दोन्ही निवडणुकांत मिळालेल्या सव्वातीन लाख मतांवर नियंत्रण शरद पवार गटाचे की अजित पवार गटाचे याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीला झालेले मतदान हे शिवसेना व भाजपविरोधी मतदान असल्याने ते यावेळी उद्धवसेनेच्या की शिंदेसेनेच्या उमेदवाराकडे जाणार याचे कुतूहल मतमोजणीनंतरच उलगडेल.
लोकसभा निवडणूक न लढण्याची भूमिका मनसेने जाहीर केली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, पालघर या लोकसभा मतदारसंघातील मनसेची मते महायुतीच्या पारड्यात पडावी याकरिता राज ठाकरे यांची जाहीर सभा हाच उपाय असू शकतो. २०१४ मध्ये ५० हजारांच्या आसपास मते मनसेला मिळाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहरात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात मनसेला दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. पाच विधानसभा मतदारसंघात मिळून २ लाख ७५ हजार मते मिळाली होती.
ठाण्याच्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचीच लढत झाली आहे. मागील निवडणुकीत आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली होती. त्यापूर्वी म्हणजे २०१४ मध्ये संजीव नाईक यांना ३ लाख १४ हजार ०६५ मते मिळाली होती. आता संजीव नाईक हे भाजपमध्ये आहेत, तर परांजपे हे अजित पवार गटात आहेत.
अर्थात राष्ट्रवादीच्या मतांवर शरद पवार व त्यांच्यासोबत असलेल्या आ. जितेंद्र आव्हाड यांचे नियंत्रण की अजित पवार व त्यांच्यासोबत असलेल्या आनंद परांजपे यांचे नियंत्रण हा कळीचा मुद्दा आहे. शरद पवार हा पक्षाचा चेहरा राहिला आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यावर फार लक्ष केंद्रित केलेले नाही. शिवाय राष्ट्रवादीची मते ही शिवसेनाविरोधी मते आहेत. त्यामुळे यावेळी शरद पवार यांच्या आवाहनामुळे उद्धवसेनेकडे किंवा अजित पवार यांच्या आवाहनामुळे शिंदेसेना अथवा भाजपकडे ट्रान्सफर होणार का, याबाबत कुतूहल आहे.