शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:39 AM2024-05-02T05:39:20+5:302024-05-02T05:41:49+5:30
नाईक यांनी अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही.
ठाणे : नवी मुंबईतील भाजपचे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव यांना डावलून शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांना ठाण्याची लोकसभेची उमेदवारी दिली गेल्याने नाईक यांच्या ताब्यातील नवी मुंबई व भाजपचा गड असलेल्या मिरा-भाईंदरमधून शिंदेसेनेला कशी साथ मिळते, याकडे या निवडणुकीत लक्ष राहणार आहे. म्हस्के यांच्या विजयाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाईकांच्या नवी मुंबईतील ‘व्हाइट हाउस’मधील कार्यालयात पायधूळ झाडावी लागण्याची दाट शक्यता दिसत आहे.
नाईक यांनी अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही. त्यांचे पुत्र संजीव नाईक हे यावेळी ठाण्यातून लोकसभा लढविण्यास इच्छुक होते व भाजपचीही तशी इच्छा होती. मात्र, शिंदे यांना ठाणे सोडायचे नव्हते. भाजपला ठाण्याचे दान सोडणे याचा अर्थ उद्धवसेनेला विरोधात मुद्दा देणे, हे शिंदे यांना ठाऊक होते. त्यामुळे नाईक यांनी शिंदेसेनेच्या निशाणीवर लढावे, असा आग्रह शिंदे यांनी धरला. मात्र, गणेश नाईक हे शिवसेनेत शिंदे यांना खूप ज्येष्ठ होते. त्यामुळे आता पुत्राला शिंदेसेनेत धाडून अप्रत्यक्षपणे शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास गणेश नाईक यांचा विरोध होता. ठाण्यात उद्धवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपची निशाणी असेल तर शिवसेनेचा मतदार शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती असतानाही उद्धवसेनेला मत देईल, ही भीती भाजपला सतावत होती. त्यामुळे अखेर शिंदेसेनेच्या म्हस्के यांना ठाणे दिले गेले.
शिंदेसेनेला हा गड राखायचा असेल तर गणेश नाईक यांना आपलेसे करावे लागेल. नाईकांची ताकद केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर मीरा-भाईंदरमध्ये आहे. नाईक आगरी समाजाचे असल्याने आगरी मतदारांवरही त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे शिंदे यांना म्हस्के यांच्याकरता नाईक यांच्या भेटीला जावे लागेल. ठाण्याचा गड राखणे ही शिंदेसेनेची गरज आहे. अन्यथा, त्याचे परिणाम विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही पक्षाला भोगावे लागतील.