लोकसभा निवडणुकीत आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 06:05 AM2019-04-01T06:05:05+5:302019-04-01T06:05:34+5:30

ठाणे लोकसभा निवडणुकीत हळूहळू आता रंगत चढू लागली आहे. शिवसेनेने गनिमी काव्याने प्रचार सुरू केला असताना राष्टÑवादीने थेट उमेदवाराच्या शिक्षणाच्या मुद्याला हात घालून विचारे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे.

In the Lok Sabha elections, the reputation of the grandmother of the grandmother-former Guardian Minister | लोकसभा निवडणुकीत आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीत आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

googlenewsNext

ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक युती व आघाडीकरिता खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची झाली आहे. ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय, सागर नाईक, भाजपाच्या मंदा म्हात्रे, शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांतून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला किती मते मिळतात, त्यावर या सर्वांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीत हळूहळू आता रंगत चढू लागली आहे. शिवसेनेने गनिमी काव्याने प्रचार सुरू केला असताना राष्टÑवादीने थेट उमेदवाराच्या शिक्षणाच्या मुद्याला हात घालून विचारे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सहा विद्यमान आमदारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. नवी मुंबईमध्ये २०१४ च्या निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांना भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी पराभवाची धूळ चारली होती. हा पराभव नाईक यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे, तर ऐरोली मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात राष्टÑवादीला यश आले होते. परंतु, पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नाईक यांनी एकहाती सत्ता संपादन करून आपले अस्तित्व दाखवून दिले. नाईक हे यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राज्यात युतीचे सरकार आल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने नाईक विरुद्ध शिंदे अशी ‘बिग फाइट’ होणार आहे. या फाइटमध्ये कोण किंगमेकर ठरणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. नवी मुंबईत शिवसेनेचे फारसे वर्चस्व नसले, तरी आजही मोदी यांचा करिष्मा ओसरलेला नाही. ही शिवसेना उमेदवारांसाठी जमेची बाजू मानली जात आहे. राष्टÑवादीने ठाणे लोकसभेची जबाबदारी ही नाईक यांच्यावर सोपवल्याने त्यांना नवी मुंबई तसेच मीरा-भार्इंदरमधून आपल्या उमेदवारांसाठी अधिकची मते खेचावी लागणार आहेत. ठाणे लोकसभा ही गणेश नाईक यांनी लढवावी, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यांनी नकार दिल्याने आनंद परांजपे यांच्या गळ्यात उमेदवारी टाकण्यात आली. त्यामुळे नाईक यांच्यापुढील आव्हान आणखी वाढले असून पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तुमचीच असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत ते परांजपे यांना किती मते मिळवून देतात, त्यावरच त्यांचे नवी मुंबईतील अस्तित्वसुद्धा निश्चित होणार आहे.
दरम्यान, मीरा-भार्इंदरमध्ये नाईक यांनी गुगली टाकत काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांचे मन वळवण्यात यश मिळवले आहे. गिल्बर्ट मेंडोन्सा हे शिवसेनेच्या जवळ गेल्याने राष्टÑवादीने मीरा-भार्इंदरचा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देऊ केला आहे. त्याच आश्वासनावर हुसेन यांनी राष्टÑवादीला टाळी दिली आहे. त्यामुळे हुसेन यांचाही लोकसभा निवडणुकीत कस लागणार आहे. हुसेन यांचा या भागात दबदबा असला, तरी विधानसभेची गणिते जुळवण्यासाठी त्यांना लोकसभेचा पेपर आधी सोपा करावा लागणार आहे. राष्टÑवादीच्या उमेदवाराला ते मीरा-भार्इंदरमधून किती मते देतात, यावर त्यांच्या विधानसभेचा मार्ग सोपा की खडतर, ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नाईकांचे नाणे या निवडणुकीत कितपत खणखणीत वाजणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. बेलापूर मतदारसंघातून भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या भवितव्याचे गणित याच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्के होणार आहेत. बेलापूर पट्ट्यातून म्हात्रे यांना विचारेंच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. येथे नाईकांनी आव्हान स्वीकारले असल्याने म्हात्रे यांच्यापुढे शिवसेनेसाठी मते मिळवण्याची तारेवरील कसरत करावी लागणार आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार सागर नाईक यांना गणेश नाईक यांच्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पेलण्याकरिता साथ द्यावी लागणार आहे. अन्यथा, ऐरोली विधानसभा त्यांच्यासाठी अवघड होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीसुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांना केवळ राजन विचारे यांच्यासाठीच नाही, तर तिकडे कल्याणमध्ये आपल्या पुत्रासाठीसुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिंदे यांना मताधिक्य द्यावे लागणार आहे. याशिवाय, ठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपाचे आमदार संजय केळकर यांचाही कस लागणार आहे. त्यांच्या पक्षातील २३ नगरसेवकांनी पुन्हा टांगा पलटी केल्याने या भागातून सेनेच्या विचारेंकरिता मतांची बेगमी कशी द्यायची, असे मोठे आव्हान केळकरांपुढे असणार आहे. भाजपाचा पवित्रा असहकाराचा राहिला, तर या मतदारसंघातून मतांची बेगमी करण्यासाठी शिंदे यांनाच मैदानात उतरावे लागणार आहे. या मतदारसंघातून विचारे यांना किती मदत होते, त्यावर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करू शकणार आहे.

दुसरीकडे ओवळा-माजिवडा मतदारसंघातूनसुद्धा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मतांसाठी झगडावे लागणार आहे. मागील निवडणुकीत सरनाईक यांना ठाण्याने तारले होते. परंतु, त्यांच्यावर मीरा-भार्इंदरची संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने या पट्ट्यातून त्यांना मतांसाठी जोर लावावा लागणार आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघात मीरा-भार्इंदरचा काहीसा भाग येत आहे. परंतु, संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सरनाईक यांच्या खांद्यावर टाकण्यात आली असताना त्यांनी या भागाकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे येथून मतांचे लीड मिळवण्याची जबाबदारी सरनाईक पेलतील का, असा सवाल केला जात आहे. मुदलात ठाणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आजी-माजी पालकमंत्र्यांसह आमदारांचा कस लागणार आहे.
 

Web Title: In the Lok Sabha elections, the reputation of the grandmother of the grandmother-former Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.