लोकसभेत गणेश नाईक राष्ट्रवादीचे ‘ठाणे’दार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 02:41 AM2019-02-14T02:41:11+5:302019-02-14T02:41:46+5:30
ठाणे शहर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाला अखेर बुधवारी झालेल्या एका गुप्त बैठकीत तिलांजली देण्याच्या आणाभाका सर्व गटांनी घेतल्या. त्यानुसार, ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा राष्ट्रवादीचाच खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ठाणे : ठाणे शहर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाला अखेर बुधवारी झालेल्या एका गुप्त बैठकीत तिलांजली देण्याच्या आणाभाका सर्व गटांनी घेतल्या. त्यानुसार, ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा राष्ट्रवादीचाच खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षाचा खासदार झाल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीसह २०२२ मध्ये होणाºया ठाणे महापालिका निवडणुकीत होईल, असा कयासही लावण्यात आला. त्यानुसार, माजी मंत्री गणेश नाईक हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. तिला माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे उपस्थित होते. या बैठकीत आव्हाडांविरोधात कारस्थान करू पाहणाºयांनी एकदिलाने काम करण्याची हमी दिली. मागील वेळी राष्टÑवादीच्या उमेदवाराचा का पराभव झाला, त्याची कारणे काय होती, आता कशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे, यावर भर देण्यात आला. त्यानुसार, येत्या काळात बैठकीला उपस्थित असणाºया प्रत्येकावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवार कोणीही असो, आम्ही एकदिलाने, जोमाने काम करू आणि मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते; किंबहुना राष्टÑवादीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास प्रत्येकाने दिला.
काही महिन्यांपासून आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे असा अंतर्गत कलह निर्माण झाला होता. त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत राष्टÑवादीला सहन करावे लागतील, असे चित्र होते. परंतु, या बैठकीत या सर्वांनीच एकतेचा नारा देऊन एकत्रितपणे काम करण्याची हमी दिली.
कल्याणामधून जितेंद्र आव्हाड
काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा आणि जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण लोकसभा लढवावी, असे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी झालेल्या चर्चेत गणेश नाईक यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. जितेंद्र आव्हाड यांना कल्याणमधून लढण्याची गळ घालण्यात आली असली, तरी त्याबाबत आजही संभ्रम कायम आहे.