रक्ताचे नाते निर्माण करण्याचे काम ‘लोकमत’ आणि वाहतूक पोलिसांनी केले- मंगेश देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:17+5:302021-07-17T04:30:17+5:30
ठाणे : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतांना रक्तदानाचे महानकार्य करुन लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी रक्ताचे नाते निर्माण ...
ठाणे : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतांना रक्तदानाचे महानकार्य करुन लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी रक्ताचे नाते निर्माण करण्याचे काम केले आहे. रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई यांनी शुक्रवारी केले.
लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त सध्या राज्यभर रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ठाण्यातही लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या दरम्यान तीनहातनाका येथील उपायुक्त कार्यालय येथील सभागृहात या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ‘महाराष्टाची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शिवाली परब हिने या उपक्रमाचे कौतुक करून लोकमतचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग व्यवसाय हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. परंतु, नागरिकांनीही कोरोनाचे नियम पाळले पाहिजे, असे आवाहन तिने केले.
विशेष म्हणजे भर पावसातही नागरिक आणि पोलिसांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहायक पोलीस निरीक्षक टी. डी. सकुंडे, गृहरक्षक दलाचे जवान सिद्धार्थ जाधव यांच्यासह २८ पोलीस कर्मचारी, तर रिक्षाचालक आणि रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांसह १६ नागरिक अशा ४४ दात्यांनी यावेळी रक्तदान केले. लोकमतचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे हेही यावेळी उपस्थित होते.
.....................................
फोटो: १६ ठाणे वाहतूक पोलीस शिबिर
कॅप्शन : लोकमत आणि ठाणे शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना अभिनेते मंगेश देसाई आणि अभिनेत्री शिवाली परब. सोबत पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील.