‘लोकमत’चा दणका; अखेर ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांना शाळेचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:55 AM2019-12-11T01:55:41+5:302019-12-11T01:55:57+5:30
निम्मी फी स्वीकारून दिले दाखले; दहावीची परीक्षा देणे शक्य
अंबरनाथ : अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत फी भरण्याच्या वादात शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये समेट होत नसल्याने तीन विद्यार्थ्यांना १०वीच्या परीक्षेला मुकण्याची वेळ आली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच काँग्रेस आणि मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनासोबत चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. दोन तास चाललेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे दाखले देण्यावर सहमती झाली. पालकांनी निम्मी फी भरल्यावर दाखले देण्याबाबत शाळेनी सकारात्कमता दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांचे १०वीचे वर्ष वाचवण्यात यश आले आहे.
अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरु होते. पालकांनी आरटीई अंतर्गत अर्ज भरल्याने त्यांना फी माफी हवी होती तर आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने फेटाळल्याने पालकांनी त्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्यासाठी नोटीस बजावली होती.
त्यामुळे शाळा आणि पालक यांच्यात वाद सुरु होता. या वादावर तोडगा निघत नसल्याने तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर होते. दहावीसाठी बाहेरुन अर्ज (१७ नंबर फॉर्म) भरण्याची मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सायंकाळी चारच्या आत शाळा सोडल्याचा दाखला मिळणे गरजेचे होते.
शाळा प्रशासन फी भरण्याच्या मुद्यावर ठाम असल्याने त्यावर तोडगा निघत नव्हता. अखेर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील, मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय गुरव, सामाजिक कार्यकर्ते आनिल कांबळे, महेश चिकणे, तुषार गांगुर्डे यांच्या पुढाकाराने मार्ग काढण्यात आला. शाळा प्रशासनासोबत चर्चा केल्यावर शाळेने पालकांना निम्मी फी भरुन शाळेचे दाखले देण्यावर सहमती दर्शवली. यावर पालकांनीही सकारात्मक भूमिका घेत शक्य तेवढी फी भरुन शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केले. अ
खेर दुपारी तीन वाजता या तिन्ही विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांच्या हातात मिळाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने त्यांनी आता बाहेरुन दहावीची परीक्षा देण्यासाठी बोर्डाकडे अर्ज केला.
शाळा प्रशासनाला सुरुवातीपासुनच आम्ही तडजोडीच्या मार्गाने प्रकरण सोडवण्याची विनंती केली होती. शाळेने वेळेवर निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यात यश आले आहे. इतर पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या तडजोडीच्या मार्गाने सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- प्रदीप पाटील, अध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस
पालक आणि शाळा यांच्यात अनेक वर्षांपासून हा वाद आहे. तो वाद या तीन विद्यार्थ्यांच्या निमित्ताने सोडवण्यात यश आले आहे. आता इतर ज्या ११ ते १२ विद्यार्थ्यांच्या समस्या राहिल्या आहेत त्यावरही यशस्वी तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. शाळा प्रशासन आणि पालकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने हे शक्य झाले आहे.
- कुणाल भोईर, शहराध्यक्ष, अंबरनाथ मनसे