लोकमत इफेक्ट : उल्हासनगरातील पाणी टंचाई विभागाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
By सदानंद नाईक | Published: March 28, 2024 07:50 PM2024-03-28T19:50:57+5:302024-03-28T19:52:23+5:30
उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे.
उल्हासनगर : सुभाष टेकडी भागातील दहाचाळ या पाणी टंचाईग्रस्त भागाचा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पाहणी करून जलवाहिनी दुरुस्ती काम सुरू करण्याचे आदेश दिले. येत्या काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन लेंगरेकर यांनी नागरिकांना दिले.
उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. गटारीचे पाईप टाकण्यासाठी सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ भागात रस्ते खोदतांना पिण्याची जलवाहिनी फुटली. जलवाहिणीत दगड व माती गेल्याने जलवाहिनीतील पाणी वितरणात अडथळे निर्माण झाले. गेल्या आठवड्या पासून परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, संतप्त महिलांनी नेताजी चौकातील विभागीय पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढून अधिकाऱ्याना घेराव घालत जाब विचारला होता. मोर्चाची बातमी लोकमत मध्ये गुरवारी प्रसिद्ध झाल्याची दखल अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी घेऊन, पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच महिलांच्या समस्या एकून घेतल्या आहेत.
शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्याच्या कामावेळी जलवाहिनी फुटून पाणी टंचाईचा प्रश्न सर्वत्र उभा ठाकत आहे. दहाचाळ येथील फुटलेल्या जलवाहिणीत दगड, माती गेल्याने, जलवाहिनेत अडथळे निर्माण होऊन, ते अडथळे काढण्याचे काम महापालिका करीत आहेत. जलवाहिणीतील अडथळे दूर करून दोन दिवसा पाणीपुरवठा नियमित होणार असल्याचें आश्वासन अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिले. यावेळी नागरिकांनी नव्याने ब्ल्यूलाईन जलवाहिनी टाकण्याची मागणी केली. शहरात भुयारी गटारीच्या योजनेमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.