‘लोकमत’चा दणका: बैलगाड्यांच्या शर्यती भरविणाऱ्यांवर गुन्हा, कायमस्वरूपी कारवाई गरजेची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 07:49 AM2021-05-28T07:49:27+5:302021-05-28T07:50:08+5:30
अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ऊसाटणे गावाच्या माळरानावर २३ मे रोजी सकाळी बैलगाड्यांची शर्यत आयोजित केली होती. बैल गाड्यांच्या शर्यतीवर बंदी असतानादेखील अशा प्रकारची शर्यत भरवल्याप्रकरणी आणि शर्यतीसाठी गर्दी जमवल्याप्रकरणी चार जणांविरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात प्रवीण पाटील, महेश पाटील, सचिन भंडारी आणि गुरुनाथ पाटील या आरोपींचा समावेश आहे.
अंबरनाथच्या ग्रामीण भागात बेधडकपणे अनेक बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येत असतात. या बैलगाडी शर्यतीकडे पोलीस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. अखेर या प्रकरणात लोकमतमध्ये वृत्त येताच पोलीस प्रशासनाने बैलगाडी शर्यत आयोजित करणार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेकदा नियम धाब्यावर बसवून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. मात्र गाजावाजा झाला तरच पोलिसांकडून कारवाई केली जाते. उसाटणे गावातील व्हिडिओ सोमवारी सकाळपासून व्हायरल झाला असून त्यानंतरही पोलिसांकडे मात्र याबाबत कुठलीच माहिती नव्हती. शर्यतींवर बंदी असतानाही त्या आयोजित होतातच कशा आणि कुणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
५० हजार ते दोन लाखांपर्यंतची शर्यत
अंबरनाथ ग्रामीण भागांमध्ये लॉकडाऊन असतानादेखील अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. पोलिसांच्या भीतीपोटी अनेक शर्यती या सकाळी सात ते सकाळी दहाच्या दरम्यान घेण्यात येत आहेत. ५० हजार ते दोन लाखापर्यंतची शर्यत भरविण्यात येत असतात. प्रत्येक शर्यत ही चुरशीची होत असल्याने ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते.