अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव; एम्स फाउंडेशन आली धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:47 PM2022-08-24T18:47:27+5:302022-08-24T18:51:14+5:30
विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते.
- विशाल हळदे
लोकमत न्यूज नेटवर्क,
ठाणे : शहापूर तालुक्यातील गुंडे ग्रामपंचायतीमधील विद्यार्थ्यांना भितारवाडीच्या शाळेत जाण्याकरिता भरपावसात दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडावी लागते, या 'लोकमत'च्या धक्कादायक बातमीची दखल ठाण्यातीलच एम्स फाउंडेशनचे फिटनेस कोच अजित कुलकर्णी यांनी घेतली. या गावातील विद्यार्थ्यांकरिता तसेच नागरिकांकरिता नदीवर एक साकव २२ दिवसांत बांधून देण्याचे आश्वासन एम्स फाउंडेशनने दिले.
विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते. भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची शाळा आहे. २७ जणांची पटसंख्या असलेल्या या शाळेत भितारवाडी आणि कोठेवाडी येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना नदी ओलांडून यावे लागते. पाऊस जास्त झाल्यावर डोंगर भागातून येणाऱ्या पाण्यामुळे नदीची पातळी वाढते आणि मुले शिक्षणापासून वंचित राहतात. गावातील मोठी मुले या लहान मुलांना धरून नदीच्या पात्रातून धरून शाळेच्या बाजूला सोडतात, शाळा सुटल्यावर परत आणतात. यामुळे मुलांच्या जीवाला धोका होता. येथील लोकांना साकव बांधून देण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सचिव प्रकाश खोडका यांनी केली होती.
मी गेल्या २० वर्षांपासून या गावात राहात आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुलांच्या शिक्षणाची परवड होते. इतक्या वर्षात आमच्या गावातील समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. आम्ही 'लोकमत'चे आणि एम्स फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो.
- विनायक हिंदुराव, स्थानिक
....आणि डोळ्यात पाणी आले
'लोकमत'ने प्रसिद्ध केलेली बातमी वाचली आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. लागलीच आम्ही ठरवले की, चाफ्याच्या वाडीत एक साकव बांधून द्यायचा. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मुंबई शेजारील ठाणे जिल्ह्यात अशी अवस्था असेल तर कठीण आहे. मी आणि माझे सहकारी यांनी नदीवर जाऊन पाहणी केली. आम्ही या ठिकाणी ८० फूट लांबीचा, नदीच्या पात्रापासून १० फूट उंच आणि तीन फूट रुदीचा ब्रिज २२ दिवसात उभारणार आहोत. येत्या तीन दिवसात हे सर्व काम सुरु होईल. यापुढे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
- अजित कुलकर्णी, संस्थापक, एम्स फाउंडेशन