नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:53+5:302021-06-10T04:26:53+5:30
ठाणे : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० जून ...
ठाणे : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० जून रोजी मानवी साखळी आंदोलन करण्याची घोषणा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरीदेखील १७ एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना मानवी साखळी आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दशरथ पाटील यांनी यावेळी दिला.
विधिमंडळात तसेच संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तीदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक रहावी यासाठी नवी मुंबईत विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ठाणे शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कारागृह, पोलीस लाइन, कळवा पूल, शिवाजी चौक, विटावा अशी मानवी साखळी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.