लोणार अशनी विवर हे जागतिक दर्जाचे विज्ञान केंद्र व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:01+5:302021-02-08T04:35:01+5:30
ठाणे : सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांबीचा, वीस लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण बुलडाणा जिल्ह्यातील लोणार ...
ठाणे : सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांबीचा, वीस लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण बुलडाणा जिल्ह्यातील लोणार या गावी आदळल्याने तेथे अशनी विवर तयार झाले. ते अनेक वर्षे दुर्लक्षित होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन लोणार अशनी विवर विकास आराखडा तयार करून निधी उपलब्ध केला आहे. त्याबद्दल खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सर्व खगोलप्रेमींतर्फे मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना लोणार अशनी विवर हे जागतिक दर्जाचे विज्ञान केंद्र व्हावे अशी मागणीही केली आहे.
सोमण म्हणाले की, लोणार अशनी विवराचा अभ्यास करण्यासाठी भारताप्रमाणेच इतर देशांचे पर्यटकही येत असतात. परंतु हे अशनी विवर दुर्लक्षित राहिल्याने अनेक गैरसोयींशी सामना करावा लागत होता. आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्याने खगोलप्रेमींचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होईल असा विश्वास सोमण यांनी व्यक्त केला.
लोणार अशनी विवराचे संवर्धन करताना तेथे मोठ्या दुर्बिणी असलेली आधुनिक वेधशाळा, खगोलशास्त्राची माहिती देणारे प्रदर्शन, म्युझियम, अंतराळ संशोधनासंबंधी आणि इस्रोच्या कामगिरीविषयी माहिती देणारे थिएटर इत्यादी गोष्टी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. लोणार अशनी विवराची आणि खगोल विज्ञानाची माहिती करून देण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक तयार करणे जरुरी आहे. लोणार अशनी विवरांचे दर्शन घेण्यासाठी खास ग्लास गॅलरी बांधल्यास पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरू शकेल. लोणार अशनी विवरात विविध प्रकारचे वृक्ष व पक्षी आहेत. त्यामुळे खगोल अभ्यासकांप्रमाणेच वृक्ष व पक्षीप्रेमींनाही हे अभ्यासाचे क्षेत्र होईल.
लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी हे लोणार विज्ञानकेंद्र उपयुक्त पर्यटन स्थळ होईल. या पर्यटन स्थळामुळे लोणार गाव व परिसराचाही विकास होईल, असेही सोमण यांनी सांगितले.