लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा घोळ दुसऱ्या दिवशीही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:48 AM2019-09-06T00:48:19+5:302019-09-06T00:48:34+5:30
पावसाचा जोर ओसरला : मध्य रेल्वे आली रुळांवर, मात्र वेळापत्रकाचे तीनतेरा; मुंबईत अडकलेले नोकरदार सकाळी परतले घरी
डोंबिवली : संततधार पावसामुळे बुधवारी दिवसभर कोलमडलेली मध्य रेल्वे अखेर गुरुवारी पूर्वपदावर आली. त्यामुळे नोकरदारवर्गाला दिलासा मिळाला. परंतु, या गाड्या विलंबाने धावत होत्या. दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या काही गाड्या या नाशिक स्थानकातून तर, कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेल स्थानकातून सोडण्यात आल्या. त्यामुळे या गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून मुंबईत कामानिमित्त गेलेले प्रवासी रात्री घरी परतू शकलेले नव्हते. त्यामुळे अनेकांनी कार्यालये, विविध रेल्वेस्थानके, शाळांमध्ये रात्र काढावी लागली. गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी होताच लोकल वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मुंबईत अडकून पडलेल्यांनी सकाळी मिळेल त्या लोकलने घर गाठले. अगोदर धीम्या लोकल सोडण्यात आल्या. त्यानंतर, सकाळी ८ वाजल्यापासून जलदमार्गावरील लोकलची वाहतूकही सुरू झाली. बुधवारी ठिकठिकाणी प्रवासी लटकल्याने गुरुवारी सकाळपासूनच मुंबईकडे जाणाºया लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी नसल्याचे पाहायला मिळाले.
पहाटेपासूनच मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्यांच्या अडकलेल्या गाड्या जलदमार्गे काढल्या. त्यामुळे या मार्गावरून सुरुवातीला उपनगरी
वाहतूक सुरू न झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली. मात्र, सकाळी ८ वाजल्यानंतर जलदच्या अप, डाउन मार्गावर लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. सकाळी ८ च्या सुमारास सुटणारी कल्याण-सीएसटीएम महिला विशेष लोकल गुरुवारी रद्द करण्यात आल्याने महिला प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तरीही लोकलसेवेवर परिणाम झाला नव्हता.
दरम्यान, कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकांमध्ये बुधवारी मध्यरात्री स्थानके तसेच स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता करण्यात आली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र, स्थानकांबाहेरील अस्वच्छता, दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले होते.
नाशिकपर्यंत जायचे कसे? अनेकांची ‘जनशताब्दी’ चुकली
च्उत्तरेकडे जाणाºया लांब पल्ल्यांच्या काही गाड्या नाशिक स्थानकापुढे वळवण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळेत त्या गाड्यांसाठी आलेल्या प्रवाशांना ठाणे, कल्याण स्थानकांत ताटकळावे लागले. अनेकांना हे बदल माहितीही नसल्याने ऐनवेळी त्यांची पंचाईत झाली होती.
च् नाशिक येथून गाड्या सोडल्या असल्या, तरी तिथपर्यंत जायचे कसे? आणि तेथे गेल्यावर संबंधित गाडी नसेल तर काय करायचे, असा सवाल करत प्रवाशांनी रेल्वेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली.
च् मुंबईहून कोकणात जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस पनवेलहून सकाळी ७.२० वाजता सोडण्यात आली. त्यामुळे ठाण्याहून प्रवास करणाºया प्रवाशांना पहाटे ट्रान्स-हार्बरमार्गाने पनवेल गाठावे लागले. मात्र, काहींना तेथे वेळेत पोहोचता न आल्याने त्यांची ही गाडी चुकली.