आगरी कोळीवाड्यांतील रहिवाशांनी काढला लॉंग मार्च,महापालिका प्रशासनाचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 02:26 PM2018-12-19T14:26:55+5:302018-12-19T14:29:03+5:30
गावठाणे कोळीवाड्यांचे सीमाकंन निश्चित करण्यात यावे, शासनाने घेतलेल्या जमीनी शेतकऱ्यांना पुन्हा द्याव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी बुधवारी आगरी, कोळीबांधवांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत लॉंग मार्च काढला. यामध्ये शेकडो बांधव सहभागी झाले होते.
ठाणे - विविध कारणांसाठी शासनाने घेतलेल्या भुमीपुत्रांच्या जमीनी परत करा, कोस्टल रोड रद्द करा, गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करा, अशा विविध घोषणा करीत बुधवारी आगरी- कोळीबांधव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकले होते. यावेळी राबोडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉँग मार्च काढून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
येत्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत महापालिका प्रशासनाच्या वतीने पाच भागांमध्ये क्लस्टर राबविण्या संदर्भातील प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात या भागातील गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळेच आता या प्रस्तावाच्या विरोधात गावठाण आणि कोळीवाडे एकत्र आले असून त्यांनी या विरोधात बुधवारी आवाज उठविण्यात आला. बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजीवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमीनी औद्योगिक प्रयोजनाकरीता घेण्यात आल्या. त्यासाठी काही शेतकºयांना अत्यल्प मोबदला तर काहींना मोबदलाच देण्यात आला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मुळ मालक असलेल्या शेतकºयांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली जात नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणने आहे. क्लस्टर योजना राबवित असतांना आधीच गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करण्यात आलेले नाही. असे असतांनासुध्दा योजनेचा प्रस्ताव महासभेत आलाच कसा असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने घोडबंदर भागात राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचा मुद्दाही या निमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला आहे. हा रोड शेतकरी, भुमीपुत्रांच्या दृष्टीने चुकीचा असून त्यामुळे येथील भुमीपुत्रांच्या जमीनी जाणार असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. यापूर्वी विविध विकास कामांसाठी घेतलेल्या जमीनींच्या बाबतीमधील अनेकांना अजून योग्य तो मोबदला मिळालेला नाही. असे असतांना पुन्हा नव नवीन प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने पुढे आणले जात आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोस्टल रोडला भुमीपुत्रांचा विरोध असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय मेट्रो कास्टींग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडी किनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील राबोडी भागातील पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढण्यात आला होता. यामध्ये ठाणे, घोडबंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबई या भागातील भुमिपुत्र सहभागी झाले होते.
समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकावा - जितेंद्र आव्हाड
यावेळी राष्ट्रवादीने या आगरी कोळीबांधवांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठींबा दर्शविला. महापालिकेत सत्ता ही शिवसेनेची असल्याने आगरी कोळी समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबावा टाकावा असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड केले. तर गावठाणे आणि कोळीवाड्यांचे आधी सिमांकन निश्चित करावे, बुलेट ट्रेनसाठी जाणाऱ्या जमीनींच्या विरोधातही आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे आश्वासन यावेळी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले.