लाँग वीकेण्ड : पिकनिकच्या मूडवर आले ‘वरसावे विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:08 AM2018-01-26T02:08:24+5:302018-01-26T11:25:42+5:30

मुंबईतून इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. शेजारील गुजरात राज्यात जाणारी बहुसंख्य अवजड वाहने ठाणे शहरातूनच जात असल्याने व त्यापैकीच एक रसायनाने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी वरसावे पुलाजवळ उलटल्याने सलग सुट्यांमुळे फिरायला निघालेल्या हजारो वाहनचालकांना सात ते आठ तासांच्या जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कधी अपघातामुळे तर कधी दुरुस्तीच्या कामामुळे वरसावे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते किंवा वळवलेली असल्याने प्रवाशांचे हाल होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

 Long Weekend: 'Varasave Vighan' on the Picnic Mood | लाँग वीकेण्ड : पिकनिकच्या मूडवर आले ‘वरसावे विघ्न’

लाँग वीकेण्ड : पिकनिकच्या मूडवर आले ‘वरसावे विघ्न’

Next

ठाणे : मुंबईतून इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. शेजारील गुजरात राज्यात जाणारी बहुसंख्य अवजड वाहने ठाणे शहरातूनच जात असल्याने व त्यापैकीच एक रसायनाने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी वरसावे पुलाजवळ उलटल्याने सलग सुट्यांमुळे फिरायला निघालेल्या हजारो वाहनचालकांना सात ते आठ तासांच्या जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कधी अपघातामुळे तर कधी दुरुस्तीच्या कामामुळे वरसावे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते किंवा वळवलेली असल्याने प्रवाशांचे हाल होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शुक्रवारपासून तीन दिवस सलग सुटी व त्यातच गुलाबी थंडीत झालेली वाढ अशा दुग्धशर्करा योगामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक कुटुंबांनी बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टँकर उलटल्याने त्यांच्या पिकनिकमध्ये वाहतूककोंडीचे विघ्न आले. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने आणि तासन्तास कोंडीत अडकल्याने कुठून ही अवदसा आठवली, अशी अनेकांची अवस्था झाली. वीकेण्डला वरसावे पूल परिसरात वाहतूककोंडी ही नित्याची बाब होऊन बसली आहे. मात्र, शहरातील मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येजा करीत असतात. त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असलेले टँकर, भले मोठे कंटेनर यांचा समावेश आहे. प्रामुख्याने ही अवजड वाहने गुजरातकडे जाण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्गावरून जातात. गुरुवारी गुजरातकडे जाणारा टँकर वरसावे पुलाजवळ उलटल्याने घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाली. शहरातून गुजरातकडे तातडीने जाण्यासाठी भिवंडीमार्गे वाहतूक वळवण्यात आली. भिवंडीतील रस्ते अरुंद असून कमालीचे खराब आहेत. त्यामुळे भिवंडीतून गुजरातच्या दिशेने जाताना प्रवाशांना अक्षरश: होडीत बसून प्रवास केल्याचा अनुभव आला. याचा फटका मुंब्रा रोडवरील वाहतुकीला बसला. शहरातील वाहतुकीवर याचा परिणाम झाला नसल्याचा दावा वाहतूक विभागाने केला.
टँकर, कंटेनर असे अवजड वाहन उलटल्यावर वाहतूक पोलिसांना तत्परतेने त्याची माहिती देण्याऐवजी चालक तेथून थेट पळ काढतो. समजा, आजूबाजूने जाणा-या एखाद्या वाहनचालकाने तातडीने तक्रार द्यायचे ठरवल्यास अशा घटनांची सूचना देण्याकरिता शासनाने जाहीर केलेले हेल्पलाइन नंबर नादुरुस्त असतात. त्यामुळे फोन नं. १०० अथवा १०१ वर कॉल करण्याखेरीज पर्याय नसतो. हे नंबर नेहमीच बिझी असल्याने तेथे वारंवार फोन करण्याशिवाय गत्यंतर नसते. गुरुवारीही याच अनुभवातून अपघाताचे प्रत्यक्षदर्शी गेल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टँकर अथवा कंटेनर उलटल्यावर तो उचलण्यासाठी ठाणे शहर वा ग्रामीण पोलिसांंकडे मोठ्या क्रेन उपलब्ध नसल्याने खाजगी मालकाकडून या क्रेन मिळवण्याकरिता खटपट करावी लागते. ती जर अगोदरच एखाद्या साइटवर कामात व्यस्त असेल, तर क्रेनसाठी बरीच यातायात करावी लागते. वाहतूक पोलिसांवर अक्षरश: क्रेनमालकांची हांजी-हांजी करण्याची वेळ ओढवते. क्रेनचा खर्च करण्यास उलटलेल्या टँकर-कंटेनरचा मालक तयार होत नाही. गुरुवारी याच समस्यांचे अग्निदिव्य पार पाडायला लागल्याचे वाहतूक पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यातच, रसायनाचा टँकर उलटल्यावर त्यातून बाहेर पडणाºया वायू अथवा रसायनांमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या भागात ही घटना घडली आहे, तेथील वाहतूक काही अंतरावर तासन्तास थांबवावी लागते. अनेक वाहनचालक घाईत असल्याने ते पोलिसांसोबत हुज्जत घालतात, वाद करतात. हेच चित्र गुरुवारी दिसले. वायुगळती थांबल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. पण, त्यासाठी सात ते आठ तास लागले.
उलटलेला टँकर- कंटेनर हलवण्यास ठाण्यासारख्या शहरात यंत्रणा नाही, ही मूळ शोकांतिका आहे. त्यामुळे वरसावे पूल व आजूबाजूच्या परिसरातील वाहतूककोंडीत भर पडली. त्यातच लाँग वीकेण्ड असल्याने शहरातून बाहेर जाणाºया वाहनांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असल्याने व्यवस्था साफ कोलमडली.
गतवर्षी जुलैमध्ये सात तास कोंडी -
ठाण्यातून वसईच्या दिशेने जाणारा एलपीजीचा टँकर ६ जुलै २०१७ रोजी दुपारी १ च्या सुमारास घोडबंदर रोडवरील काजूपाड्याजवळ असाच उलटला. या टँकरमधून अतिज्वलनशील वायूची गळती सुरू झाल्याने अत्यंत वर्दळीच्या अहमदाबाद-मुंबई महार्गावरील घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती. मदतकार्यासाठी भारत गॅसच्या तज्ज्ञ पथकास ठाण्यात बोलावण्यात आले होते. हा टँकर हलवण्यासाठी सात तास लागल्याने प्रवासी हैराण झाले होते.
वीकेण्डला दुरुस्तीचा बसला होता फटका
कळवा-विटावा पुलाच्या दुरुस्तीचे काम २२ डिसेंबर २०१७ रोजी हाती घेतले होते. त्यामुळे या दिवसांत सर्वत्र वाहतूककोंडी दिसत होती. याचदरम्यान, वीकेण्डमुळे ठाणेकरांना कोंडीला सामोरे जावे लागले होते.

 

Web Title:  Long Weekend: 'Varasave Vighan' on the Picnic Mood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.