समर्थकांचे राणे यांच्या आजच्या भूमिकेकडे लक्ष, राणे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:38 AM2017-09-21T03:38:17+5:302017-09-21T03:38:19+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी आपल्या राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय जाहीर केल्यावर कल्याण-डोंबिवलीतील समर्थक त्यांच्यासोबत जाणार आहेत. राणे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे राणे समर्थकांनी स्पष्ट केले.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी आपल्या राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय जाहीर केल्यावर कल्याण-डोंबिवलीतील समर्थक त्यांच्यासोबत जाणार आहेत. राणे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे राणे समर्थकांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील राणे यांचे समर्थक संजय निकते यांनी सांगितले की, ठाणे, कल्याण व डोंबिवलीतील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राणे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय पक्का आहे. गणेशोत्सवापूर्वी कणकवलीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासंदर्भात निकते आणि राणे हे दिवसभर एकत्र होते. त्या वेळी कल्याण-डोंबिवलीतील समर्थक आपल्यासोबत आहोत की नाही, याची चाचपणी त्यांनी केली होती.
कल्याण पूर्वेत कोळसेवाडी, तर डोंबिवलीत राणेंचे जुने सहकारी, समर्थक आहेत. सध्या ते जरी विविध पक्षांत असले, तरीही राणेंच्या संपर्कात असल्याचा दावा निकते यांनी केला. कोकणातील मूळचे रहिवासी डोंबिवलीतील चिंचोड्याचापाडा, उमेशनगर, महाराष्ट्रनगर, गरिबाचावाडा आदी ठिकाणी नोकरीनिमित्त राहत आहेत. जे कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ येथील आहेत, त्यांचे राणेंशी व्यक्तिगत संबंध आहेत. त्यापैकी काहींनी राणेंच्या भूमिकेला समर्थन दिले, तर काहींनी आम्ही येथे राहात असलो, तरी कोकणातच मतदानाला जावे लागते, असेही सांगितले.
>‘आता संपर्क नाही’
काँग्रेसचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे हे सध्या सेनेचे नगरसेवक आहेत. ते एकेकाळी राणे समर्थक होते. ते म्हणाले की, जेव्हा त्या पक्षात होतो, तेव्हा राणे यांच्या संपर्कात होतो. मात्र, आता शिवसेनेत आल्यापासून त्यांच्याशी राजकीय संबंध नाहीत.