डेब्रिज ठेकेदाराकडून लूट; ठामपा महासभेत सदस्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:19 AM2019-08-10T00:19:26+5:302019-08-10T00:19:42+5:30
२० ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याचे आदेश
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील डेब्रिज उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीस आतापर्यंत आठ कोटी अदा करूनही शहरात अनेक ठिकाणी डेब्रिजचे साम्राज्य आहे. डेब्रिजवर प्रक्रिया करून त्यापासून पेव्हरब्लॉक, रेती, टाइल्स तयार करूनही ठेकेदार कंपनी नफा कमावत असून त्यासाठी महापालिकेने डायघर येथे मोफत जागाही दिली आहे. डेब्रिज उचलून त्यावर कंपनी अतिरिक्त पैसे आकारत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी शुक्रवारी महासभेत करून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली. याबाबतचा अहवाल येत्या महासभेत सादर करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या. यामुळे थीम पार्कपाठोपाठ ठाणे शहरात डेब्रिज घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.
शहरातील डेब्रिज उचलण्यासाठी महापालिका एका टनामागे १०५० रुपये अदा करते. त्यानुसार, एका ट्रकमधून १० ते १२ टन डेब्रिज नेले जाते. असे असतानाही ही कंपनी शहरातील डेब्रिज उचलत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. इतकेच नव्हे तर आयुक्तांच्या निवासस्थानाकरिता आरक्षित भूखंडावरील डेब्रिजही उचलण्याची तसदीही घेत नसल्याचे भाजपाच्या दीपा गावंड म्हणाल्या. डायघर येथे विविध उत्पादने करण्यासाठी जो प्रकल्प सुरू आहे, तिथे अद्यापही काहीच काम सुरू नसून प्रकल्पाचा केवळ दिखावा केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला.
शहरात आतापर्यंत किती डेब्रिज उचलले, त्यापोटी किती रक्कम दिली, अशी विचारणा सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी केली असता प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी आतापर्यंत ४२ हजार टन डेब्रिज उचलले असून त्यापोटी आठ कोटी रुपये अदा केल्याची माहिती दिली.
बिल्डरांकडून प्रतिट्रक दोन हजारांची अतिरिक्त कमाई
स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी, तर ही कंपनी शहरातील खाजगी बिल्डरांचे डेब्रिज उचलण्यासाठी दोन हजार रु पये प्रतिट्रक घेत असून महापालिकेकडूनही वेगळे भाडे घेते, असा गंभीर आरोप केला. माजी महापौर अशोक वैती यांनी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महापौर विरोधी पक्षनेते सभागृह नेते आदी दौरा करावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या सुहास देसाई यांनी या प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली. कळवा परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनीवर डेब्रिज टाकल्याने पिकांचे नुकसान झाले असल्याचे सेनेच्या नगरसेविका विजया लासे यांनी सांगितले. अशा प्रकारे डेब्रिजबाबत भ्रष्टाचार करणाºया कंपनीमागे कोण आहे, असा प्रश्न मीनल संख्ये यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात असलेला हा गोल्डन ठेकेदार कोण, याची माहिती सभागृहाला द्या, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीही या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. अखेर, सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन महापौरांनी या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल येत्या २० आॅगस्टच्या महासभेत सादर करण्याचे निर्देश दिले