डायलेसिसच्या केंद्रचालक संस्थेकडून ठाण्यात लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:33 PM2019-12-20T23:33:13+5:302019-12-20T23:33:22+5:30

महासभेत गोंधळ : महापालिकेने स्वत: चालविण्याची मागणी

loot in Thane by the Dialysis Center | डायलेसिसच्या केंद्रचालक संस्थेकडून ठाण्यात लूट

डायलेसिसच्या केंद्रचालक संस्थेकडून ठाण्यात लूट

Next

ठाणे : वार्षिक दोन लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना डायलेसिसची मोफत सुविधा देण्यासाठी संबंधित एजन्सीला ठाणे महापालिका प्रत्येक रु ग्णामागे एक हजार ४० रु पये अदा करत असली, तरी हे पैसे परत मिळावे, यासाठी संबंधित एजन्सीकडून शासनाकडे क्लेमच केला जात नसल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याने हे डायलेसिस सेंटर संबंधित एजन्सीकडून काढून एखाद्या सेवाभावी संस्थेला द्यावे किंवा पालिकेने स्वत: चालवावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत केली आहे.


शहरात तीन ते चार टक्के रुग्णांना डायलेसिसची आवश्यकता असून या सर्वांना खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. एका डायलेसिससाठी १८०० ते २००० पर्यंत खर्च असल्याने खाजगी रुग्णालयात डायलेसिस करणे सर्वसामान्यांना परवडत नव्हते. महापालिकेने ही गैरसोय दूर केली असून शहरात चार ठिकाणी सुरू केलेल्या डायलेसिस सेंटरमध्ये दोन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या रु ग्णांना ही सुविधा मोफत दिली आहे. मात्र, संबंधित एजन्सीकडून हा क्लेम केला जात नसल्याने ठाणे पालिकेचे अनेक वर्षांपासून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही कळवा रुग्णालयातील सेंटरचा मुद्दा उपस्थित करून सवलत देत नसताना त्यांचा ठेका का रद्द केला जात नाही, असा प्रश्न या सभेत केला.

खासगी संस्था लाटते तिप्पट फायदा
या डायलेसिस केंद्रांच्या माध्यमातून ज्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत आहे, त्या रुग्णांवर मोफत डायलेसिस उपचार करण्यात येणार आहेत. तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ते आठ लाख आहे, त्या रुग्णांसाठी ५२० रुपये फी आकारण्यात येणार आहे. तसेच ज्यांचा वार्षिक उत्पन्न गट आठ लाखांच्यावर आहे, त्या रुग्णांसाठी १०४० रुपये फी आकारण्यात येत आहे. ज्यांना मोफत सुविधा देण्यात येते, त्या प्रत्येक रु ग्णामागे ठाणे महापालिका संबंधित एजन्सीला एक हजार ४० रु पये अदा करते, तर या पैशांची परतफेड मिळावी, यासाठी संबंधित एजन्सीने शासनाच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत क्लेम करणे आवश्यक आहे.
जो संबंधित एजन्सीकडून केला जात नसल्याने ठाणे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. क्लेम न केल्यामुळे पालिकेकडून मिळणारे पैसे तसेच एक ते आठ लाख उत्पन्न गटातील रुग्णांकडून ५२० रु पये आणि आठ लाखांच्या वर उत्पन्न असलेल्या
रु ग्णांकडून एक हजार ४० असा तिप्पट फायदाही संस्था घेते.

यापूर्वी उघड झाला गैरप्रकार
ठाणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या डायलेसिसच्या रुग्णांना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. दोन वर्र्षांपूर्वी आरोग्य विभागाकडून या डायलेसिस सेंटरसाठी पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या जागेत डायलेसिस सेंटर चालवण्यासाठी ज्या संस्थेला २५ वर्षे करार करून जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्या सेंटरमध्ये गरीब रु ग्णांना सवलत दिली जात नसल्याचा प्रकार यापूर्वी तत्कालीन महापौर संजय मोरे यांच्या कार्यकाळात उघड झाला होता. मोरे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेशदेखील दिले होते.
शहरात चार केंद्रांत ४० बेडची सुविधा
शहरात पाच ठिकाणी डायलेसिसची केंदे्र उभारण्यासाठी पालिकेचे प्रयत्न होते. मात्र, केवळ चारच ठिकाणी ही सेंटर सुरू केली आहेत. प्रत्येक केंद्रांवर १० डायलेसिस मशीन अशा चार केंद्रांवर ५० मशीन ठेवल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर १० बेड असे चार केंद्रांवर ४० बेड उपलब्ध करून दिले आहेत. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले होते.

Web Title: loot in Thane by the Dialysis Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.