बदलापूरमधील ग्राहकांची केबलचालकांकडून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:13 AM2019-03-14T00:13:16+5:302019-03-14T00:13:55+5:30
जोडणीसाठीही घेतात पैसे; चॅनल निवडण्याच्या अर्जांची सर्रास विक्री
बदलापूर : बदलापूरमध्ये केबलचालकांनी ग्राहकांची लूट सुरू केली आहे. सरकारच्या आदेशानंतर ग्राहकांना पसंतीचे चॅनल निवडण्याचे जे अधिकार दिले आहेत, त्याची माहिती केबलचालकांनी ग्राहकांना देणे गरजेचे आहे. मात्र, बदलापूरमधील काही केबलचालकांनी पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी जो अर्ज तयार केला आहे, तो अर्ज विकण्याचे आणि अर्ज भरून देण्यासाठी पैसे उकळण्याचे काम सुरू केले आहे.
ज्या ग्राहकांनी अर्ज केलेले नाहीत, त्यांची केबलजोडणी तोडण्याचे प्रकार सुरू केले आहेत. जोडणी तोडल्यानंतर अर्ज केलेल्या ग्राहकाला पुन्हा केबलजोडणीसाठी सरसकट १५० ते २०० रुपये आकारत आहेत. सध्या बदलापूरमध्ये केबलचालकांविरोधात संताप पसरला आहे. येथील केबलचालकांनी ग्राहकांच्या हक्कावरच गदा आणण्याचे काम सुरू केले आहे. ग्राहकांकडून पसंतीच्या चॅनलचा पॅक घेण्यासाठी जो अर्ज भरण्याची सक्ती केली आहे, त्या सक्तीचा गैरवापर सुरू करण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील केबलचालकांनी अर्ज विकत देण्याचे काम सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर अर्ज भरून घेण्यासाठी ५० रुपये स्वतंत्र आकारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. अनेक ग्राहकांनी अजूनही अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे त्यांची केबलजोडणी काढण्याचा प्रकार पुढे येत आहे. त्यातही केबलचालकांनी आपला खिसा भरण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकाची केबलजोडणी बंद केल्यावर तो ग्राहक लागलीच अर्ज भरत असल्याने अर्ज भरण्याचे आणि सोबत पुन्हा केबलजोडणी सुरू करण्याचे १५० ते २०० रुपये आकारण्याचे काम सुरू केले आहे. केबलचालकांच्या या दादागिरीची तक्रार नेमकी कुणाकडे करावी, हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. बदलापूरमधील बहुसंख्य केबलचालकांनी हा प्रकार केल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
बदलत्या नियमांची माहिती देऊन ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी ही केबल व्यावसायिकांची आहे. मात्र, बदलापूरमधील केबलचालकांनी ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात अतिरिक्त पैसे लाटणाऱ्या केबलचालकांवर कारवाई करण्याची मागणी ग्राहक करत आहेत.
तक्रार आल्यास कारवाई करू
मनोरंजनकर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत या केबलचालकांवर नियंत्रण केले जाते. मात्र, तक्रारीसाठी नागरिक पुढे येत नसल्याचे समोर येत आहे.