घर लागल्याचे सांगून दागिने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:32 PM2017-08-06T23:32:28+5:302017-08-06T23:32:28+5:30
प्रधानमंत्री योजनेत तुम्हाला घर लागले आहे, अशी बतावणी करून कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने घरातील ७२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने लुटल्याचा प्रकार शनिवारी घडला
ठाणे : प्रधानमंत्री योजनेत तुम्हाला घर लागले आहे, अशी बतावणी करून कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने घरातील ७२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने लुटल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भास्करनगर भागातील एका ३० वर्षीय महिलेला एका भामट्याने फोन करून ‘तुम्हाला प्रधानमंत्री योजनेत घर मिळाले आहे’, अशी ५ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बतावणी केली. त्यासाठी कागदपत्रे लागणार असल्यामुळे तिच्या मुलालाच ठाण्याच्या कोर्टनाका येथे त्वरित आधारकार्ड तसेच इतर कागदपत्रांची झेरॉक्स प्रत घेऊन येण्यास सांगितले. ही महिला मुलासह कागदपत्रे घेऊन तिथे गेल्यानंतर तिच्या घरात शिरून या भामट्याने मंगळसूत्रासह ७२ हजार ५०० चे दागिने चोरून पलायन केले. विचित्र प्रकारे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने रात्री ८ वाजताच्या सुमारास कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, १८ जुलै रोजीही साईनाथनगर येथील राज भोसले यांच्या पत्नीला घरकुल योजनेत फॉर्म भरला आहे का, अशी विचारणा करणाºया भामट्याने राज यांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर, त्यांना फोन करून त्यांच्याकडूनही त्याने ३० ते ३५ हजारांचे दागिने लुबाडले.
....................
आमिषाला बळी पडू नका
कोणीही कोणत्याही योजनेत घर किंवा पैसे देण्याचे आमिष दाखवले, तर कोणतीही कागदपत्रे देऊ नका. अशा कोणत्याही योजनेची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच संबंधित विभागात कागदपत्रे द्या. पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांनी केले आहे.