तोतया सीबीआय अधिका-याने घातला ८५ लाखांचा गंडा, दारूविक्रीचा परवाना, नोकरीचे दाखवले आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:42 AM2018-01-02T04:42:13+5:302018-01-02T04:42:53+5:30
सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून एका महाठगाने ठाणे आणि गुजरातच्या काही व्यापाºयांना तब्बल ८५ लाख रुपयांना गंडा घातला आहे.
ठाणे - सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून एका महाठगाने ठाणे आणि गुजरातच्या काही व्यापाºयांना तब्बल ८५ लाख रुपयांना गंडा घातला आहे.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारे महेश पालिवाल हे एका इन्शुरन्स कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये त्यांच्या वसईतील एका परिचितास ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्या वेळी पालिवाल यांचा परिचय अनंतप्रसाद पांडे याच्याशी झाला. आपण सीबीआयच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे हेड आहोत, अशी ओळख त्याने करून दिली. मार्च २०१६ मध्ये पांडेने पालिवाल यांना मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेटीसाठी बोलावले. पालिवाल त्यांचा भावनगर येथील मित्र कृष्णकांत बगरिया याला सोबत घेऊन गेले. त्या वेळी दारूविक्रीचा एक परवाना उत्पादन शुल्क न भरल्याने बंद पडला असून तो २० ते २२ लाख रुपयांत विकत मिळू शकतो, असे पांडेने सांगितले. पालिवाल यांनी पत्नीच्या नावे दारूविक्रीचा परवाना घेण्याची तयारी दाखवली. मार्च ते आॅगस्ट २०१६ या काळात पालिवाल यांनी आरोपीला थोडेथोडे करून १६ लाख २६ हजार रुपये दिले. दारूचे दुकान भावनगर येथील मित्र कृष्णकांत बगरिया याला चालवायला द्यायचे, असे पालिवाल यांनी ठरवले होते. त्यानुसार, परवाना विकत घेण्यासाठी मदत म्हणून बगरियाच्या भावाने पाच लाखांचे कर्ज घेऊन त्याला रक्कम दिली.
दारूविक्रीचा परवाना एक-दोन महिन्यांत मिळेल, असे पांडेने पालिवाल यांना सांगितले. चितळसर येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये १० दुकाने खाली असून ती मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून मिळू शकतात, असेही त्याने सांगितले. पालिवाल यांनी हे मित्र खुबचंद सेजवानी यांना सांगितले. त्यांनी पाच दुकाने घेण्याची तयारी दर्शवली. या दुकानांसाठी पालिवाल यांनी सेजवानी यांच्याकडून ५० लाख घेऊन पांडेला दिले. दरम्यान चर्चगेट रेल्वे स्थानकावर स्टॉल उपलब्ध असल्याचे पांडेने सांगितले. पालिवाल यांनी गुजरातमधील त्यांचा मित्र युवराजसिंग गुलाबसिंग गिरासे याला ही बाब सांगितली. गिरासे यांनी त्यांच्या कार्यालयातील प्रफुल्ल कांतिलाल पटेल यांना ही आॅफर दिली. प्रफुल्ल यांनी त्यासाठी तीन लाख रुपये दिले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये पालिवाल आणि पांडे हे भरूच येथे गिरासे यांना भेटण्यासाठी गेले. त्या वेळी रेल्वेमध्ये टीसीची काही पदे रिक्त असून २० लाख रुपयांत नोकरी मिळू शकते, असे आरोपीने सांगितले. यासाठी गिरासे यांच्या परिचयातील काही रहिवाशांकडून आरोपीने १८ लाख ७५ हजार रुपये उकळले. दरम्यान नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपीचा मुलगा दुर्गेश पांडेच्या साखरपुड्यासाठी पालिवाल उत्तर प्रदेशात गेले. तेथे आरोपी अनंतप्रसाद पांडे हा सीबीआय अधिकारी नसून मुंबई पोलीस दलात शिपाई असल्याचे पालिवाल यांना समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शनिवारी कासारवडवली पोलिसांत तक्रार दिली.
आरोपी मुंबई पोलीस दलात शिपाई
तोतया सीबीआय अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणारा अनंतप्रसाद पांडे हा मुंबई पोलीस दलात शिपाई असल्याचा दावा तक्रारदार महेश पालिवाल यांनी केला. वानखेडे स्टेडियमजवळ आपण त्याला हातात वॉकीटॉकी आणि कमरेला रिव्हॉल्व्हर लावून पोलिसांच्या गाडीत बसलेला पाहिले होते, असे पालिवाल यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांचा हा दावा पडताळणे अद्याप बाकी असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी सांगितले.