प्रभू श्रीराम हे खाजगी मालमत्ता नाही ; उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका
By धीरज परब | Published: December 25, 2023 01:28 PM2023-12-25T13:28:59+5:302023-12-25T13:29:20+5:30
मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले .
मीरारोड - मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले . मग काय महाराष्ट्रातल्या हिंदूंना मोफत दर्शन मिळणार नाही का ? श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणाला मत दिले हे विचारून दर्शन देणार का ? प्रभू श्रीराम हे तुमची खाजगी मालमत्ता नाही अशी टीकेची झोड माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मीरारोड येथील गोवर्धन पूजा सोहळ्यात केली . यावेळी भाजपा महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर नेत असल्या बद्दल ठाकरे यांनी टीका केली .
मीरा भाईंदर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रामदेव पार्क भागात गोवर्धन पूजा कार्यक्रमात रविवारी रात्री ठाकरे दर्शनासाठी आले होते . यावेळी खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , लक्ष्मण जंगम , माजी नगरसेविका तारा घरत, पवन घरत सह यादव संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष रंगबहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर.बी. यादव आदी उपस्थित होते.
श्रीरामाचे मंदिर होतेय गर्वाची गोष्ट आहे. जय श्रीराम हे हजारो वर्षां पासून म्हटले जात आहे . तुम्ही तर आता आलात . जय श्रीराम , जय बजरंगबली म्हटले कि सर्व हिंदू त्यांच्या बरोबर जातील असे त्यांना वाटते . ते हिंदूंच्या विरोधात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत . पण तुमची हुकूमशाही संपवण्याची शक्ती प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण देईल.
शिवसेनेचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे. नैसर्गिक आपत्ती , दंगे , अपघात कोणतीही आपत्ती आली तेव्हा शिवसैनिक जीवाची परवा न करता पुढे असतो व तेच आमचे हिंदुत्व आहे . हाच फरक आहे त्यांच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात. ९२ च्या दंगलीत शिवसेनेने हिंदूंना वाचवले . त्यावेळी भाजप कुठे होती ? मुंबई जळत होती तेव्हा एकटे बाळासाहेब आणि शिवसेना होती . अधर्माच्या विरुद्ध धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे . देशासाठी प्राण देणारे, देशाला आपले मानणारे हे सर्व आपलेच आहेत . आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असे ठाकरे म्हणाले .
मुंबईत सर्व पोटापाण्यासाठी आले . पण आता काम कुठे करणार ? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्व उद्योग धंदे गुजरात मध्ये नेत आहेत . मग आता काय सर्व उठून गुजरात मध्ये कामासाठी जाणार का ? इकडे राहणारे गुजराती पण गुजरात मध्ये जाणार का ? गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा म्हणता, मग काय महाराष्ट्र , उत्तर प्रदेश व अन्य राज्ये मजबूत झाली तर देश मजबूत नाही होणार काय ? असे सवाल ठाकरे यांनी केले . गुजरात मजबूत होत असेल करा त्या बद्दल आमचा विरोध नाही उलट आनंद आहे पण महाराष्ट्राचे हिरावून नको असे ठाकरे म्हणाले .
कोरोनाच्या संकटकाळात आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने जनतेसाठी देवीदेवतांच्या आशीर्वादाने मोठे प्रभावी काम केले . मराठी आणि उत्तरभारतीय यांच्या ऐक्यात मीठ टाकण्याचे काम करणाऱ्यां पासून सावध रहा . आज पर्यंत शिवसेनेने आणि मी मुख्यमंत्री असताना जे कार्य केले त्याचा अनुभव लक्षात ठेवत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अधर्माचा नाश करून धर्माचे सरकार आणायचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले .