धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 09:09 PM2023-03-23T21:09:32+5:302023-03-23T21:11:35+5:30
साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला.
ठाणे-
साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी नेमाडे यांची छोटेखानी मुलाखत देखील घेण्यात आली. मुलाखतीत भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परखड मत व्यक्त केलं.
धर्म आणि राष्ट्रीयता या दोन गोष्टींमुळेच देशाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. तसंच माणूस आजही 'हंटर'च आहे. आजही तर सेकंदाला बलात्कार होतात, खून होतात आणि आरोपी अनेक वर्ष सापडत नाहीत. हेच आपले 'अच्छे दिन' आहेत, असंही नेमाडे पुढे म्हणाले.
धर्म आणि राष्ट्रीयतेवर नेमकं काय बोलले नेमाडे?
"जगात सगळ्यात खराब गोष्ट काही असेल तर ती धर्म आणि राष्ट्रीयता हिच आहे. मी पाकिस्तानात, चीनमध्येही गेलोय. तिथंही आपल्यासारखेच लोक आहेत. पाकिस्तानात कडेवर एक मुल घेऊन जाणारी स्त्री मी पाहिलीय. चीनमध्येही महिलांना आपल्या साडीचं अप्रूप असतं. सगळी चांगली लोक आहेत. सरकार वाईट असतात. राष्ट्र वाईट असतं. तेच आपल्यात झुंजी लावून भानगडी करत राहतं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. धर्म आणि राष्ट्रीयता अजिबात मानायच्या नाहीत. लेखकांच्या त्याच्या पलिकडे जाऊन लिहावं, असंही ते पुढे म्हणाले.
'अच्छे दिन' काय तेही सांगितलं...
"माणूस अजूनही हंटर वृत्तीचा म्हणजे शिकारीच्या काळात जसा होता तसाच आहे. आजही दर दोन-तीन मिनिटांनी बलात्कार होतात. खून होतात आणि १५ वर्ष आरोपी सापडत नाहीत. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात. अशावेळी लेखकांचं काम असतं की सर्वांना चांगलं बोलणं किंवा वरवरचं वागू नये. परखडपणे मत मांडावं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.
आपल्या मनात जे येतं ते खरं असतं कारण आपल्या नेणीवांमध्ये ते येत असतं. फक्त आपल्याला चौकट बरोबर सांभाळावी लागते. कुठल्याही कलेला पक्की चौकट लागते. चौकटीत लिहिणं बरेचदा दुर्देवानं मला जमत नाही. त्यामुळेच गेली पाच वर्ष मी पोलीस सुरक्षेखाली आहे. ही खरंतर वाईट परिस्थिती आहे. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात असं मी मानतो, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.