पावसाची ‘झाडा’झडती!, झाड पडून ठाण्यात सहा गाड्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:25 AM2018-06-18T03:25:03+5:302018-06-18T03:25:03+5:30
आठवडाभरापासून बेपत्ता झालेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावत ठाण्यात अक्षरश: झाडाझडती घेतली.
ठाणे : आठवडाभरापासून बेपत्ता झालेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावत ठाण्यात अक्षरश: झाडाझडती घेतली. जोरदार पावसाने ठाणे शहरात दोन ठिकाणी झाडे कोसळून सहा गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. या पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून उकाड्यापासृून मुक्तता होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्ह्यात मागील २४ तासांत २०५ मिमी पाऊस पडला असून रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ठाणे शहरातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी सहा गाड्यांवर झाडे उन्मळून पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनहातनाका परिसरातील इटर्निटी सोसायटीजवळ पार्क केलेल्या पाच चारचाकी, तर घोडबंदर रोडवरील रुणवाल इस्टेटजवळ पार्क केलेली एका चारचाकी अशा सहा गाड्यांवर झाडे पडली. तीनहातनाका येथे सोहनी उत्तमानी, मनीषा गिंदे, अनिल हेरूर, उमा हेरूर, नेहा शर्मा आणि रुणवाल इस्टेट येथे शरद दळवी यांच्या मालकीच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर ठामपा अग्निशामक दल आणि आपत्ती कक्षाच्या जवानांनी तातडीने धाव घेत झाडे हटवली. सकाळी ९.१५ ते ९.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.
याशिवाय, मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक रविवारी दिवसभर विस्कळलेली होती. त्यात पावसाची सतत रिपरिप सुरू असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरांतील बहुतांशी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. ठाणे शहरात दोन शॉर्टसर्किटच्या घटनांसह दोन आगीच्या घटना घडल्या. काही सखल भागांत पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीला ठाणेकरांना तोंड द्यावे लागले. सुटीचा दिवस असल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्यांना मात्र पावसामुळे बाहेर पडणे शक्य झाले नाही.
दिवसभराच्या कालावधीत खाडीला कमीअधिक प्रमाणात भरती होती. ठाणे महापालिकेच्या अंदाजानुसार सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा काही ठिकाणी उसळल्या. ठाणे शहरात दिवसभराच्या कालावधीत २२ मिमी पाऊस पडला, तर जिल्ह्यात सकाळी ७.३० वाजेपर्यंत २०५ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली. यामध्ये कल्याणला २५ मिमी, मुरबाडला १३.५०, उल्हासनगरला २२, अंबरनाथला १५.२०, भिवंडीला ७० आणि शहापूरला १२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.
>जोरदार पावसामुळे भिवंडीतही झाडे पडली..
भिवंडी : शहरात आजपर्यंत २०४ मिमी पाऊस झाल्याची माहिती मनपाने दिली असून, जोरदार पावसामुळे शहरातील वेताळपाडा व चाविंद्रा या दोन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सखल भागात पाणी साचले. खंडूपाडा, तानाजीनगर, नारपोली, दर्गा रोड, कारिवली, पद्मानगर, कल्याण रोड आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते. काही भागांत अद्यापही गटारे साफ न झाल्याने त्या भागात पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुपारनंतर थोडी उघडीप झाल्यानंतर शहरवासीयांनी घराबाहेर पडत सुस्कारा सोडला.मात्र, काही मुख्य मार्गावर व अंतर्गत रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा येथील बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. रविवार असूनही सकाळपासून शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदीसाठी अडथळा निर्माण झाला.
>शेतकरी सुखावला
मुरबाड : दडी मारलेल्या पावसामुळे हैराण झालेल्या नागरिकांना व पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकºयाला रविवारच्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीकामाला वेग येणार आहे. आधीच पेरणी केलेली असल्यामुळे हा पाऊस त्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास शेतकºयांना आहे.