हरवलेला बाबा तिला क्षणभर लाभला अन् आनंद फुलला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:29 AM2019-01-06T05:29:02+5:302019-01-06T05:29:31+5:30
बालकोत्सवाला उदंड प्रतिसाद : मुलांच्या सुखाकरिता घटस्फोटानंतरही एकत्र आले आईबाबा ; ५० मुलांनी घेतला सहभाग
ठाणे : जेमतेम पाच वर्षांची आदिश्री आपल्या बाबांना बिलगली होती. ती बाबांबरोबर फेर धरून नाचत होती... त्यांना कविता म्हणून दाखवत होती. सहा वर्षांचा ध्रुव इतर बालगोपाळांसोबत खेळत होता खरा, पण त्याचे लक्ष सतत आपल्या बाबांच्या वाटेकडे होते. अशीच काहीशी अवस्था राहुल, विशाखा, किशोर, ब्रिजेश वगैरेंची होती. आईवडिलांचा घटस्फोट झाल्याने ते आईसोबत राहत होते आणि त्यांच्या आयुष्यातील ‘बाबा’ दुरावला होता. काहींना त्यांचा बाबा ‘बालकोत्सवा’त भेटला, पण काही मोजक्या मुलामुलींचा बाबा इथं पोहोचलाच नसल्यानं ती हिरमुसली झाली.
रुसलेले चेहरे, दुभंगलेली मनं अशा अवस्थेत कौटुंबिक न्यायालयाच्या पायरीवर घटस्फोटासाठी येणारी जोडपी आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरील हास्यासाठी, त्याच्या समाधानासाठी आपल्या नात्यातील कटुतेचा पीळ बाजूला सारून मुलामुलींचा हात धरून त्यांच्यासोबत नाचताना, फेर धरताना पाहायला मिळाली. शनिवारी सायंकाळी कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात आयोजित ‘बालकोत्सवा’त हेच चित्र होते. पालकांचे सततचे वाद, त्यांची घटस्फोटाची प्रक्रिया पाहणाºया मुलांना आईवडिलांचे प्रेम मिळतेच, असे नाही. त्या मुलांना पालकांसोबत वेळ व्यतीत करण्याच्या उद्देशाने हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजिला होता. या कार्यक्रमात सुमारे ५० पालक आपल्या मुलांना घेऊन सहभागी झाले होते. मुलांनी आईवडिलांसोबत रॅम्पवॉक केला, तेव्हा त्यांचे चेहरे उजळले होते. खेळ खेळताना आणि एकत्रित नृत्य करताना त्यांच्या चेहºयावरून ओसंडून वाहणारा आनंद स्पष्ट दिसत होता. एरव्ही, आरोप-प्रत्यारोपांच्या ठिणग्या, हिंसाचाराच्या कहाण्या, संशयपिशाचाच्या काळ्या सावल्या पाहणाºया कौटुंबिक न्यायालयाच्या भिंती शनिवारी मौजमजा, मस्ती, खुदुखुदु हास्याची कारंजी उडताना पाहत होत्या. आई किंवा वडील या दोघांपैकी एकाकडे राहणाºया मुलामुलींना बालकोत्सवाचे हे दोन तास कधी कापरासारखे उडून गेले, ते कळलेच नाही. साºयांना एकत्र आणणारा बालकोत्सव कधी संपूच नये, अशी त्या बालगोपाळांची भावना होती.
माझा बाबा एकटाच राहतो, मी आईबरोबर राहते. बाबा कधीतरीच भेटतो. आज कार्यक्रमात दोघांसोबत एकत्र राहता आले, खूप छान वाटलं, कायम असेच असले पाहिजे, असे लहानगी नाव्या निरागस चेहºयाने सांगत होती. मी आईसोबतच असते. बाबा खूप दिवस भेटत नाही, पण मला त्याची सतत आठवण येते. आज कार्यक्रमाला बाबा आला. माझ्यासोबत गेम्स खेळला. आय लव्ह माय डॅडा, असे सांगताना छोटीशी आदिश्री बाबाला अक्षरश: बिलगली होती. मी मम्मीसोबतच राहतो. बाबा कधीच भेटत नाही आणि आजही नाही आला, असे सांगताना ध्रुव रडवेला झाला होता. मुलांसोबत आलेले काही पालकही बोलते झाले. घटस्फोटामुळे इथे यायला मन तयार नसले, तरी केवळ आपल्या मुलांच्या चेहºयावरील क्षणिक हास्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. पण, दोघांनीही तसा विचार करायला हवा, असे भाग्यश्री जाधव म्हणाल्या. घटस्फोटाच्या खटल्यात शेवटच्या टप्प्यावर असलेले किंवा घटस्फोट झालेली काही जोडपी आपल्या मुलासाठी या कार्यक्रमात सहभागी झाली होती. आपल्या एकत्र येण्याने मुलं खूश होणार, म्हणूनच आम्ही कार्यक्रमात एकत्र आल्याचे इंगोले यांनी सांगितले.
ताटातुटीचा क्षण येताच फुटला अश्रूंचा बांध
च्या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश अरुणा फरस्वानी, समुपदेशक डॉ. एम. देसाई तसेच कोर्ट मॅनेजर मानसी देसाई उपस्थित होते. मुलं आणि पालकांच्या हस्ते एकत्रितपणे केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
च्निघण्याची वेळ आली, तेव्हा वडिलांना चिकटून बसलेली विशाखा हमसूनहमसून रडू लागली. तिच्या आईने तिने वडिलांच्या गळ्याला मारलेली मिठी पोलादी बोटांनी सोडवून तिचा ताबा घेतला. बाबा न आल्याने हिरमुसला किशोर जड पावलांनी जिना उतरत होता आणि अश्रूंचे ओघळ त्याच्या गालावरून घरंगळत होते...