हरवलेलं मुक्काम पोस्ट : बालमनात रुजतंय अंधश्रद्धेचं बीज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:58 AM2018-10-02T04:58:15+5:302018-10-02T04:58:56+5:30
लक्ष्मी मुकादम
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्यात, जिल्हयात, गावात, समाजात अगदी कुटुंबव्यवस्थेतील चालीरीती, रूढी, परंपरा यात विविधता, भिन्नता दिसून येते. समतोलच्या संपर्कात येणारी मुलेही भिन्न राज्यांतील, संस्कृतींतील, भिन्न भाषा बोलणारी असतात. या मुलांमध्ये समतोल साधण्याचे कठीण काम समतोल फाउंडेशन गेली १५ वर्षे करत आहे. वेगवेगळ्या राज्यांतील मुलांच्या समस्याही भिन्न असतात. या सर्वांचा विचार करूनच मुलांशी संवाद होत असतो.
मो. रसुद्शेख (बदललेले नाव) वय १० वर्षे. गुजरातमधील मुलगा समतोलच्या संपर्कात आला. नेहमीप्रमाणे मुलाने खोटे बोलायला सुरुवात केली. अनेक विषयांवर चर्चा करताना आईनेच स्टेशनवर सोडले, असे मुलगा म्हणत होता. परंतु, पुढे काय करायचे, असे विचारल्यावर घरी जायचे आहे, असेही म्हणत होता. म्हणजेच घराबद्दल, आईबद्दल प्रेम आहेच, पण रागही आहे, असे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. मुलाला अनेक गोष्टींची माहिती होती, परंतु ती चुकीची होती, हे गप्पा मारताना समजले. परंतु, या गोष्टी मुलाने लहानपणापासून ऐकल्यामुळे मनात घर करून बसल्या होत्या. कोणत्या होत्या या गोष्टी? तर, आपल्याला माहीत आहे की, काही जण शक्यतो गळ्यात किंवा दंडामध्ये तावीज घालतात. का, तर कोणाची नजर लागू नये किंवा भूतबाधा होऊ नये या कारणास्तव.
गुजरातमधल्या या मुलाला आईवडील दोघेही नाही. परंतु, मावशीने त्याला सांभाळले आहे. वडील टीबी होऊन वारले व आईला तंबाखूमुळे कॅन्सर झाला, असे नानीने सांगितल्याचे तो मुलगा म्हणतो. त्याचा सांभाळ त्याच्या मावशीने केला. मावशीने त्याच्या लहान काकाबरोबरच लग्न केले. त्यांनाच तो आईवडील मानतो. हा मुलगा मुंबईत आईबरोबर आला आणि त्याचा हात सुटला, तर कधी आई पाणी आणायला जाते, म्हणून गेली व आलीच नाही, म्हणून स्टेशनवर राहिलो, अशा दोनतीन गोष्टी स्वत: सांगतो. तुझे आईवडील आजाराने वारले म्हणून तुझ्यामुळे माझ्या मुलांनाही आजाराची लागण होईल, तुलाच कुठेतरी सोडून येते, असे म्हणून मावशीसारखी ओरडते आणि मारहाण करते. नक्की काय कारण समजायचे, ते कळत नव्हते.
मुलाला पत्ता नीट माहीत नसल्यामुळे त्याचे घर सापडत नाही. परंतु, गप्पा मारताना त्याने आणखी काही गोष्टी समजल्या. त्याच्या आईवडिलांचा आत्मा मुलामध्ये आहे. तो आजारी पडला की, डॉक्टरकडे जात नाही. उलट, तेव्हा तो कबरस्तानमध्ये जातो व तेथील एखाद्या कबरेमधील माती अंगाला लावून घेतो. त्यामुळे अंगात ताप येत नाही. तीच माती थोडीशी कागदात गुंडाळून तावीजमध्ये भरलेली आहे. त्यामुळे तो कोणालाच घाबरत नाही. आता हे जरी पोरकट वाटले, तरी तो मुलगा असे सर्व विचार माझे आईबाबा, आजी करते, म्हणूनच मी करतो, असेही सांगतो. यावरूनच, आजही आपल्याकडील काही समाज कोणत्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, हे दिसते. तेवढ्याच वयाचा उत्तर प्रदेशमधून आलेला मुलगा जेव्हा आमच्या शिबिरात दाखल होतो, तेव्हा सर्व मुलांबरोबर जेवायला न बसता एकटा बसतो. लहान असूनही सर्वांपेक्षा जास्त जेवतो, असे वारंवार दिसून आले. त्याच्याशी मैत्री करून माहिती घेताना असे कळले की, त्याच्या आजोबांनी त्याच्या अंगात सैतान घुसला आहे, असे सांगितले. त्यामुळे मी जे खातो, ते सैतान खातो व त्याला खूप जेवण लागते, असे म्हणू लागला. त्यामुळे तो कधी जुलाब, तर कधी पोट दुखते म्हणून नेहमी तक्र ार करायचा.
आता यावर उपाय तो काय? येणाऱ्या अनेक अनुभवांवरून समतोलच्या प्रत्येक शिबिरात अंधश्रद्धानिर्मूलन समितीला बरोबर घेऊन आम्ही मुलांसाठी कार्यक्रम घेत असतो. त्यातून अनेक मुलांच्या मनातील शंका व भीती दूर होते. त्या शिबिरात नारळातून काळी दोरी काढली जाते व ती कशी ठेवली जाते, इथपासून तर तावीजमधील माती, अंगारा कसा खोटा असतो, हे मुलांना सांगितले जाते. अनेक मुले यातून सावरतात व बरी होतात. पण, काही परंपरा या मुलांचे किती नुकसान करतात. त्यांचा विकास होत नाहीच. उलट त्यातून बालकाचा मृत्यू झाल्याची काही उदाहरणे दिसून आलेली आहेत.
हजारो उदाहरणे समतोलकडे असतील, पण मुलांना न्याय देणाºया आमच्या यंत्रणांनी या सर्व गोष्टींचा कधी विचार केला आहे का? फक्त बालगृहात दाखल झाले, म्हणजे मुलांना मदत झाली किंवा मुलांचा विकास झाला, असे होत नाही. बालगृहात सोयी नाहीत, तर काही ठिकाणी बालगृह ही व्यवस्थासुद्धा नाही. जिथे माणसे आहेत त्यांना कार्यपद्धतीच माहीत नाही. काय आदेश दिल्याने मुलांची सुरक्षितता व विकास होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. सर्व यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात, यावर चर्चा होत नाही. कर्मचारी कमी असल्याने व्यवस्था कमी, असे सूत्र पाठ करूनच ठेवलेले असते. कर्मचारी होणे सोपे असते, पण कार्यकर्ता होणे अवघड असते, याची जाणीव असणे गरजेचे आहे.
यासाठी आपला समाज, समाजातील परंपरा, रूढी समजल्या पाहिजेत. कायदा बनवण्यापेक्षा कायदा समजून घेणे महत्त्वाचे आहे, तरच खरा न्याय त्या बालकांना मिळेल. अन्यथा, ७० वर्षे होऊनही मुलांचे हक्क, अधिकारावर चर्चा करताना दिसणाºया त्रुुटी पुढेही दिसत राहतील. यासाठी आपण स्वत: बालप्रेमी व समाज बालस्नेही असला पाहिजे.
गळ्यात तावीज बांधले की, नजर लागत नाही किंवा भूतबाधा होत नाही. ताप आला की, डॉक्टरकडे न जाता कोणता तरी अंगारा, धुपारा लावावा अशा प्रकारचे किस्से जे मुलं घरात किंवा आजूबाजूच्या वातावरणात ऐकतात, त्यावर ती आंधळा विश्वास ठेवतात. या रूढी-प्रथा, अंधश्रद्धा मुलांचे नुकसान करतात. या अंधश्रद्धेचे बीज जणू त्यांच्या बालमनात रूजू लागते. त्यातही विविध कारणास्तव घर सोडून आलेल्या मुलांवर अशा गोष्टींचा काय परिणाम होत असेल, याचा विचार कोणी करतच नाही. शासकीय यंत्रणा तर अशा घर सोडलेल्या मुलांना केवळ बालगृहात भरती करतात. मात्र, त्यांच्यासाठी सर्व सुविधा असाव्या, मुलांसाठी वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक असावा, यासाठीही यंत्रणेने समतोलदृष्ट्या काम केले पाहिजे.