गहाळ झालेल्या मोबाईलचा परराज्यात प्रवास, ४५ जणांना परत दिले मिळवून
By प्रशांत माने | Published: March 14, 2023 08:12 PM2023-03-14T20:12:25+5:302023-03-14T20:12:32+5:30
टिळकनगर पोलिसांची कामगिरी
डोंबिवलीःशहरात मोबाईल गहाळ आणि चोरी होण्याचे प्रमाण वाढले असताना गेल्या पाच ते सहा महिन्यांत अशाप्रकारे गहाळ झालेल्या ४५ मोबाईलचा तांत्रिक माहीतीच्या आधारे शोध घेत ते संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्यात आले. टिळकनगर पोलिसांनी ही कामगिरी केली असून गहाळ झालेले मोबाईल महाराष्ट्रासह गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, राजस्थान येथून परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोबाईल गहाळ आणि चोरी झाल्याबाबत टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींवर पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी तांत्रिक माहीतीच्या आधारे गहाळ झालेले मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्याचे आदेश दिले होते. त्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे आणि पोलिस नाईक निस्सार पिंजारी यांनी पाच ते सहा महिन्यात गहाळ झालेल्या ४५ मोबाईलचा सी ई आय आर पोर्टलच्या आधारे शोध घेत ते संबंधित तक्रारदारांना सुपूर्त केले. पोलिसांनी हरवलेला मोबाईल पुन्हा मिळवून देण्याची किमया साधल्याबद्दल संबंधितांनी समाधान व्यक्त केले तर मोबाईल परत मिळताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.