रस्ता रुंदीकरणाला खो
By admin | Published: October 27, 2016 03:41 AM2016-10-27T03:41:50+5:302016-10-27T03:41:50+5:30
आधीच्या रस्ता रूंदीकरणतून विकासाचा गाजावाजा करत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुका तोंडावर येताच अचानकपणे नव्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला
ठाणे : आधीच्या रस्ता रूंदीकरणतून विकासाचा गाजावाजा करत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुका तोंडावर येताच अचानकपणे नव्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला खो घालण्यास सुरुवात केली आहे. ज्या पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या निविदा प्रक्रियेला महासभेनेही मान्यता दिली होती, त्याच रस्त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत दुसऱ्यांदा सादर झाले असता, ते आठविरुद्ध एक अशा मताधिक्क्याने नामंजूर करण्यात आले.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. तिला सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनीदेखील पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीही या कारवाईचे कौतुक केले होते. त्यानुसारच, आयुक्तांनी दुसऱ्या टप्प्यात कॅडबरी ते खोपट जंक्शन या रस्त्याची रेषा निश्चित करणे, शिवाजी पथ आलोक हॉटेल ते अजरामरजी चौक, लालबहादूर शास्त्री मार्ग, गोखले रोड, राममारुती रोड आदी रस्त्यांचे मार्जिनल स्पेस निश्चित करण्याचे प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीत ते मंजुरीसाठी पटलावर ठेवले होते. मागील बैठकीत हे विषय स्थगित ठेवून सत्ताधाऱ्यांनी त्यांचा संपूर्ण तपशील मागवला होता.
स्थायी समितीत ते पुन्हा मंजुरीसाठी आले असता हे पाचही प्रस्ताव नामंजूर केल्याची घोषणा स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी केली. परंतु, या रस्त्यांच्या निविदांना यापूर्वीच मंजुरी दिली असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. त्यामुळे, त्या निविदांचे काय करणार, असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला. तर, आधी रस्त्यांच्या रुंदीकरणाला पाठिंबा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता याच प्रस्तावांना विरोध का केला. आधीदेखील अनेकांची बांधकामे बाधित झाली. अनेक हरकती आल्या होत्या. व्यावसायिक गाळे तोडले गेले. असे असताना आताच विरोध का, असा सवाल उपस्थित करून मनोज शिंदे यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. मात्र ठराव नामंजूर झाल्याने निविदा प्रक्रिया रद्द करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
अनेक हरकती आल्याचे कारण
या रस्त्यांसंदर्भात अनेक हरकती आल्याने प्रस्ताव नामंजूर केल्याचे स्थायी समिती सभापतींनी स्पष्ट केले. परंतु, शिंदे यांचे समाधान न झाल्याने सर्व विषय मतदानाला टाकले. या वेळी सत्ताधाऱ्यांनी आठविरुद्ध एक अशा फरकाने हे प्रस्ताव नामंजूर केले. काँग्रेसच्या यासीन कुरेशी यांनीही आपल्याच पक्षाच्या शिंदे यांना पाठिंबा दिला नाही. पाच सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे प्रस्ताव नामंजूर झाला. त्यांच्या निविदांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मत प्रभारी नगर अभियंता रतन अवसरमोल यांनी व्यक्त केले.