प्रामाणिक रिक्षाचालकामुळे मिळाले हरवलेले दीड लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:31+5:302021-09-02T05:28:31+5:30
मीरा रोड : रिक्षात विसरून गेलेल्या प्रवाशांची दीड लाख रुपये रोख असलेली बॅग प्रामाणिक रिक्षाचालकामुळे परत मिळाली आहे. बुधवारी ...
मीरा रोड : रिक्षात विसरून गेलेल्या प्रवाशांची दीड लाख रुपये रोख असलेली बॅग प्रामाणिक रिक्षाचालकामुळे परत मिळाली आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास नवघरनाका येथे रिक्षाचालक वासुदेव सावंत यांनी तेथे कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस सुधाकर सपकाळे यांना भेटून रिक्षात एक प्रवासी स्वतःची बॅग विसरून गेल्याचे सांगितले. सावंत यांनी ती बॅग होती तशीच सपकाळे यांच्याकडे दिली.
सपकाळे यांनी ती बॅग उघडली असता त्यात बॅग ज्याची होती त्या जय पोपटलाल गडा यांचे ओळखपत्र, व्हिझिटिंग कार्ड आणि दीड लाख रुपये रोख आढळली. व्हिजिटिंग कार्डवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता सकाळी दहीसर येथून भाईंदरला येण्यासाठी रिक्षा पकडल्यानंतर दहीसर चेकनाका येथे उतरताना बॅग रिक्षातच विसरल्याचे गडा यांनी सांगितले. सपकाळे यांनी त्यांना बोलवून बॅग त्यांचीच असल्याची शहानिशा केल्यानंतर ती त्यांना परत केली. गडा यांनी रिक्षाचालक सावंत यांच्यासह सपकाळे यांचे आभार मानले. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सावंत व सपकाळे यांचे कौतुक केले.