सेल्फीच्या नादात गमावला जीव, पाय घसरल्याने दरीत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:56 AM2018-06-21T05:56:11+5:302018-06-21T05:56:11+5:30
दिल्लीच्या महिलेचा माथेरान येथे सेल्फी काढताना पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
माथेरान : दिल्लीच्या महिलेचा माथेरान येथे सेल्फी काढताना पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
सरिता चौहान असे या महिलेचे नाव आहे. ती पती राममहेश व तीन मुलांसह माथेरान येथे फिरायला आली होती. १९ जून रोजी लुईसा पॉइंट पाहण्यासाठी ते संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पोहोचले. त्या वेळी सरिता आणि राममहेश यांनी काही सेल्फी काढले. पॉइंटला सुरक्षा कठडा असूनही दाम्पत्य कठड्याबाहेर जाऊन सेल्फी काढत होते. पावसाळी वातावरण असल्याने वारे जोरात वाहत होते. वाऱ्याच्या झोकात दोघे सेल्फी काढत असताना सरिताचा तोल जाऊन ती १३०० फूट खोल दरीत कोसळली. ही माहिती माथेरान पोलीस ठाण्याला मिळताच ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गुप्तचर विभागाचे अण्णासाहेब मेटकरी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे अक्षय परब, उमेश मोरे आदीसह हाशाची पट्टी येथील आदिवासी दत्ता ढुमणे, अनंता पारधी आदीनी रात्री ८.३० वाजता दरीत शोध सुरू केला. धुक्यामुळे अडचणी येत होत्या. रात्री १० वाजता मृतदेह दरीतून काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले.