कोकण मंडळातील ५३११ घरांची सोडत, वर्षभरात एक लाख घरे देणार - गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
By अजित मांडके | Published: February 24, 2024 12:47 PM2024-02-24T12:47:27+5:302024-02-24T12:47:39+5:30
मागील काही वर्षांपासून घरांची नोंदणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. ई फॉर्म पद्धत सुरू करण्यात आली असून नागरिकांचा त्रास कमी झाला आहे.
ठाणे : राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळीवे, असा शासनाचा संकल्प असून पुढील वर्षभरात एक लाख घरे वितरित करण्याचा गृहनिर्माण विभागाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांची सोडत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज काढण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यासाठी सर्वांना हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन विविध प्रकल्प राबवित आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे आज ५३११ घरांची सोडत काढण्यात आली. प्रथमच पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आली. याद्वारे कुणालाही तक्रार करण्याची संधी ठेवण्यात आली नाही. निवड झालेल्या लाभार्थींना ऑनलाईन मेसेज पाठविण्यात आले.
मागील काही वर्षांपासून घरांची नोंदणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. ई फॉर्म पद्धत सुरू करण्यात आली असून नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. यापुढे लाभार्थींना पैसे भरण्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. यापूर्वी शासनाने पारदर्शकता आणून मुंबई, पुणे मंडळाची संगणकीय पद्धतीने सोडत काढली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात १५ हजार घरांचे वितरण करण्यात आले. आगामी काळात गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचा आमचा संकल्प आहे. कामगार आयुक्तांच्या माध्यमातून दीड लाख गिरणी कामगारांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना लवकरच हक्काच्या घरांचे वितरण करण्यात येणार आहे, असे सावे म्हणाले.