कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:25 AM2021-06-27T04:25:50+5:302021-06-27T04:25:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर किंवा वाहतूककोंडीत कर्णकर्कश हॉर्न वाजवित राहण्याचे प्रकार विशेषत: दुचाकीस्वारांकरून वाढले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर किंवा वाहतूककोंडीत कर्णकर्कश हॉर्न वाजवित राहण्याचे प्रकार विशेषत: दुचाकीस्वारांकरून वाढले आहेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणे आणि सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखा आवाज करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आणि इतर वाहनचालकांना अस्वस्थ करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात ठोस कारवाईची मोहीम नुकतीच वाहतूक पोलीस विभागाकडून उघडण्यात आली. २०२० ते २४ जून २०२१ पर्यंतचा दीड वर्षाचा आढावा घेता कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांकडून १८ हजारांचा तर सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखा आवाज करणाऱ्यांकडून दोन लाख ७८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांनुसार हॉर्न कधी व कशासाठी वाजवावेत, कुठे वाजवू नयेत, याचेही काही नियम आहेत. परंतु, नियम मोडत सर्रास हॉर्न वाजविला जातो. काही दुचाकींना पोलिसांचा सायरनही लावला जातो. कोंडीतून पुढे जाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. दरम्यान, कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांबरोबरच सायलेन्सरद्वारे कानठळ्या बसवणारे आवाज काढून दुचाकी चालविणाऱ्यांना कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी मध्यंतरी चांगलीच अद्दल घडविली. तब्बल ११६ मॉडीफाइड सायलेन्सर पोलिसांनी रोडरोलर चालवून नष्ट केले. ठाणे विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई झाली.
याचबरोबर सिग्नल तोडणे, नो-पार्किंग, हेल्मेट नसणे आदींप्रकरणी दीड वर्षात केलेल्या कारवाईचा आढावा पाहता २०२० मध्ये २३ हजार ४४५ केसेस दाखल करून १२ लाख ५६ हजार ३०० रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला. तर, २०२१ मध्ये जून २४ पर्यंत १६ हजार ३३ केसेस दाखल झाल्या असून, १२ लाख ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
-----------
फॅन्सी हॉर्नची फॅशन
हॉर्नचा आवाज करीत वेगाने गाडी चालविण्याची क्रेझ युवकांमध्ये दिसून येते. आपल्या दुचाकीला म्युझिकल हॉर्न, प्रेशर हॉर्न लावून रस्त्यावरून सैरभैर आवाज करताना ते दिसून येतात. लावलेला हॉर्न किती महागडा आहे त्यावर ही फॅशन दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. सोबतच बुलेट हॉर्न, सायरन हॉर्नही पाहावयास मिळतो.
-------------------------------------
कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...
शहरातील अनेक प्रतिबंधित क्षेत्रात हॉर्न वाजविणाऱ्यावर बंदी आहे. रुग्णालये, न्यायालये, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे ‘नो हॉर्न’ असा फलक लावलेला असतो. मात्र, असे असतानाही अनेक वाहनधारक बिनदिक्कतपणे प्रेशर हॉर्न लावून मोठे आवाज करताना दिसून येतात. वाहतूक पोलिसांना असे आढळून आल्यास अशांवर कलम ११९(२)/१७७ नुसार कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
---------------------
कानाचेही आजार वाढू शकतात
जोरजोरात हॉर्न वाजविल्यामुळे तसेच सायलेन्सरच्या मोठ्या आवाजांमुळे नागरिकांना कानाचे आजार जडू शकतात. कानाला दडी बसणे, कानाचे पडदे लवचिक असल्याने कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. रक्तदाबाचा त्रासही होतो. आवाजामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणे तसेच मेंदूलाही त्रास होणे असे आरोग्यासंबंधी प्रकार घडतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-------------------------------------------
नियम पाळा, दंड टाळा
वाहतुकीचे नियम पाळणे हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. कर्णकर्कश हॉर्न आणि फटाक्यांच्या आवाजाचे सायलेन्सर लावून इतरांना त्रास देऊ नका. आमची कारवाई सुरू असून पुढेही ती चालूच राहणार आहे. वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांविरोधातही विशेष मोहीम चालू आहे. तसेच सिग्नल तोडणे, नो-पार्किंग, हेल्मेट नसणे अशा एकूणच दीड वर्षात केलेल्या कारवाईत २४ लाख ६५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग कल्याण
--------------------------------------------
वाहनचालकांना झालेला दंड
२०२०
सिग्नल तोडला - ४,४००
नो-पार्किंग झोन - ९,०६,४००
हेल्मेट नाही - ३,२३,०००
कर्णकर्कश हॉर्न -१३,५००
सायलेन्सर- ६,०००
---------------
२०२१ (२४ जूनपर्यंत)
सिग्नल तोडला -३,०००
नो-पार्किंग झोन ८,०१,१००
हेल्मेट नाही १,२९,०००
कर्णकर्कश हॉर्न ४,५००
सायलेन्सर २,७२,०००
-----------------