प्रेमप्रकरणात अपयश, महिला पोलिसाच्या मुलाने आयुष्य संपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:04 AM2024-02-29T10:04:44+5:302024-02-29T10:05:09+5:30
मोहित हा गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घरातील पंख्याला ओढणीच्या सहायाने आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्रेमात अपयश आल्याने महिला पोलिस हवालदाराच्या मुलाने वसंत विहार येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मोहित खापरे (२४) असे मुलाचे नावे असून ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. ‘आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसून प्रेमप्रकरणातील अपयशाने हा निर्णय घेतला’ अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहित हा गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घरातील पंख्याला ओढणीच्या सहायाने आत्महत्या केली.
प्रेमप्रकरणात अपयश
मोहितची आई कापूरबावडी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. आई ड्युटीवर तर वडीलही बाहेर गेले होते. त्याची चुलत बहीण जागृती पाटील ही त्यांच्याकडे काही कामानिमित्त आली. त्यावेळी मोहितने गळफास घेतल्याचे समोर झाले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. प्रेमप्रकरणातील अपयशाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे तपासात आढळले. या प्रकरणाचा सपाेनि मुक्ता फडतरे तपास करीत आहेत.