भिवंडीतील प्रेमीयुगुलाने खारेगाव खाडीत घेतली उडी
By जितेंद्र कालेकर | Published: July 15, 2018 10:07 PM2018-07-15T22:07:43+5:302018-07-15T22:18:03+5:30
आपल्या प्रेमाची कबूली देत भिवंडीच्या काल्हेर भागातील शिवपाल चौधरी आणि खुशी चौधरी या प्रेमीयुगूलाने खारेगावच्या खाडीत रविवारी दुपारी स्वत:ला झोकून दिले. या दोघांचाही ठाणे अग्निशमन दल आणि नारपोली पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
ठाणे : आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. एकमेकांशिवाय जगू शकत नाही, असे म्हणत शेरोशायरीच्या चिठ्ठ्या तयार करून आम्ही १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खारेगाव खाडीत आत्महत्या करत आहोत, असा व्हिडीओ मोबाइलमध्ये तयार करून शिवपाल चौधरी (२०) आणि खुशी चौधरी (१९) या दोघांनी खारेगाव येथील खाडीत स्वत:ला झोकून दिले. या दोघांचाही ठाणे अग्निशमन दलाला उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.
खारेगावच्या खाडीत तरुणतरुणीने उडी घेतल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कळवा उपविभागाचे अमित सिंग आणि बोरगावकर या दोन पोलिसांना रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी पाहणी केली. तेव्हा त्यांना एक बॅग मिळाली. याच बॅगेत काही चिठ्ठ्या आणि मोबाइल मिळाला. हा मोबाइल शिवपालचा असल्याची माहिती प्रसन्ना मौन्सी या त्याच्या सहकाऱ्याकडून मोबाइलमुळे पोलिसांना मिळाली. एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करणाºया शेरोशायरी लिहिलेल्या मुलीच्या चिठ्ठ्याही पोलिसांना त्यांच्या बॅगेतून मिळाल्या. बॅगेतील आधारकार्डच्या आधारे तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती समोर आली. तिचा आणि त्याचा नेमका पत्ता समजलेला नाही. मात्र ते भिवंडीतील काल्हेर भागातील रहिवाशी असल्याचे समजते. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठाणे अग्निशमन दलाच्या मदतीने खारेगावच्या खाडीत या दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, खाडीला पाणी जास्त असल्याने तसेच पावसाचा जोरही जास्त असल्याने त्यांचा शोध लागू शकला नाही. या दोघांनीही आपण रविवारी दुपारी १२ वाजता खारेगाव टोलनाका येथील खाडीत आत्महत्या करतोय, असे हिंदीमधून कथन करणारा व्हिडीओ मोबाइलमध्ये बनवला. आत्महत्येपूर्वी मोबाइल आणि बॅग खाडीपुलावर ठेवत असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.
‘मेरा प्यार हासील नहीं होगा, मै खुदखुशी करने जा रहा हू’ असेही या व्हिडीओमध्ये शिवपालने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचाही शोध घेण्यात येत असून त्यांनी दुपारी खाडीत उड्या घेतल्याचे एका व्यक्तीने पाहिले, अशी नोंद नारपोली पोलीस ठाण्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक संजय भेंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.