तृतीयपंथीयाची हत्या केल्याप्रकरणी प्रियकर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:07 AM2019-05-22T00:07:58+5:302019-05-22T00:08:01+5:30
काटेमानिवली येथील घटना : शाप देणे बेतले जीवावर
कल्याण / मुंब्रा : कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणाऱ्या धीरज उर्फ रेवा देसाई या तृतीयपंथीयाला शाप दिल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचा प्रियकर सुशील भालेराव याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास उघडकीस आली. ‘तुझे खानदान नष्ट होईल,’ असा शाप रेवाने सुशीलला दिला होता. यात त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. याचा राग सुशीलला होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
रेवा देसाई हा १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहत होता. तो काटेमानिवली येथील शिवसह्याद्री कॉलनीतील चाळीत वास्तव्याला होता. दरम्यान मागील तीन दिवसांपासून रेवाच्या घराच्या दरवाजाला लॉक होते. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा दिसल्याने खोली मालकीणीची मुलगी भाग्यश्री हंजनकर हिने प्रथम रेवाला आवाज दिला. परंतु, कोणीही बाहेर न आल्याने तिने आत जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळयात रेवाचा मृतदेह चटईवर पडलेला आढळून आला. त्याच्या शरीरावर धारधार हत्याराने वार झाले होते. याची खबर तत्काळ स्थानिक कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, सुशीलने हत्या केल्याचा आरोप रेवाच्या नातेवाइकांनी केला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. सुशीलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती.
मैत्रिणीशी झाले होते संभाषण
सुशील नेहमी रेवाच्या घरी यायच्या. पण संशयावरून तो रेवाला सातत्याने मारहाण करायचा. १६ मे रोजीदेखील तो घरी आला होता आणि संशयावरून रेवाला त्याने मारहाण केली होती. ही माहिती रेवाच्या एका मैत्रिणीने त्याच्या नातेवाइकांना दिली. तिने रेवाला फोन केला होता, तेव्हा माझी तब्येत बरी नसून, सुशील हा माझेकडे आला आहे व तो संशय घेऊन मला मारहाण करीत आहे, असे त्याने मैत्रिणीला सांगितले होते.
मुंब्रा पोलिसांची कारवाई
हत्या करून पसार झालेल्या सुशीलला मुंब्रा पोलिसांनी शिताफीने मंगळवारी सकाळी मुंब्रा रेतीबंदर परिसरातून अटक केली. त्याचा ताबा कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आला.
गुरुवारीच झाली हत्या
रेवाच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली. परंतु, सुशीलने रेवाची हत्या मागील गुरुवारी पहाटेच्या सुमारास केली होती. यानंतर तो घराला कुलूप लावून तो निघून गेला होता. दरम्यान रेवाचा खरोखरच मृत्यु झाला आहे का हे पाहण्यासाठी रविवारी त्याने पुन्हा त्याचे घर गाठले आणि दरवाजाला कुलूप न लावताच तेथून निघून गेला.
वडिलांची कैची खुपसून हत्या
डोंबिवली : खर्चाला कमी पैसे देत असल्याच्या रागातून मुलाने वडिलांवर कैचीचे वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे पश्चिमेकडील कोपर रोड परिसरात घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी मुलगा अरविंद हरके यास अटक केली आहे. तर, सुभाषचंद्र (७०) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. वडील हे नातेवाइकांना खर्चाला पैसे देत होते. मात्र, आपल्याला कमी पैसे देतात, असा राग अरविंदच्या मनात होता. मंगळवारी पहाटे दोघांमध्ये या कारणावरून जोरदार भांडण झाले. संतापलेल्या अरविंदने कैचीने सुभाषचंद्र यांच्या मानेवर वार केला, तसेच डोक्यात हातोड्याने प्रहार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.