जलवाहिनी फुटल्यानंतर २७ गावांत कमी दाबाने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:15+5:302021-06-16T04:52:15+5:30
डोंबिवली : पाणी पुरवठा योग्य दाबाने करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सोमवारी ...
डोंबिवली : पाणी पुरवठा योग्य दाबाने करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सोमवारी एमआयडीसीच्या पाणीपुरवठा उपअभियंत्यांना दिले. २८ मे रोजी कल्याण शीळ महामार्गावर एमआयडीसीची जलवाहिनी फुटली होती, तेव्हापासून पाणी कमी दाबाने येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
जलवाहिनी फुटली, की त्यानंतर बरेच दिवस २७ गावांतील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेला जबाबदार धरतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना तीव्र होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी तातडीने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. भोपर, संधप, नांदीवली, सांगावं, सागरली, आजदे यांसह अन्य गावात पाणी पुरवठ्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. भोपर परिसरातील समस्या सोडवण्यात यावी म्हणून समाजसेवक अमर माळी, माजी नगरसेविका रविना माळी आदी महापालिका, एमआयडीसीकडे तक्रारी करत आहेत. त्याची दखल घेऊन महापालिकेने आधीही एमआयडीसीला पत्र दिले होते, त्याचाही उल्लेख नव्या पत्रात केला आहे. समस्या सुटावी आणि नागरिकांना पाणी।मिळावे अशी अपेक्षा महापालिकेने एमआयडीसीकडे व्यक्त केली आहे.