भिवंडी मनपाच्या हरित दिवाळी स्वाक्षरी मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद; दिवाळी नंतरही फलकावर अवघ्या १६ स्वाक्षऱ्या
By नितीन पंडित | Published: November 16, 2023 08:06 PM2023-11-16T20:06:09+5:302023-11-16T20:06:18+5:30
शहराचा विचार करता शहरात सुमारे १५ लाख लोकसंख्या आहे.
भिवंडी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होत असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी भिवंडी महापालिकेने स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी स्वाक्षरी मोहीम राबविली होती मात्र या स्वाक्षरी मोहीमेला भिवंडीकरांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून दिवाळी सणा नंतरही मनपा मुख्यालयाच्या तळमजल्यावर स्वाक्षरी मोहिमेसाठी ठेवलेली दोन फलकांपैकी एका फलकावर अवघ्या सोळा स्वाक्षऱ्या दिसल्या तर एक फलक पूर्ण कोरे होते.
शहराचा विचार करता शहरात सुमारे १५ लाख लोकसंख्या आहे.तर मनपा प्रशासनाचा विचार करता सुमारे मनपा प्रशासनात सुमारे साडेचार हजार कामगार कार्यरत आहेत मात्र या स्वाक्षरी मोहिमेत मनपा कर्मचाऱ्यांनी देखील पाठ फिरविल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
दुसरीकडे ऐन दिवाळी सणातच स्थानिक नागरिकांनी डम्पिंग ग्राउंड बंद केल्याने शहरात दिवाळी सणात कचऱ्याचे ढीग साचले होते. अनेक भागात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना आरोग्याच्या व दुर्गंधीचा प्रश्न गंभीर बनला होता.
रस्त्यावर साचलेला कचरा मनपा प्रशासन उचलत नसल्याने या कचऱ्यास आग लावण्यास नागरिकांनी सुरुवात केली होती त्यामुळे शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. त्यामुळे स्वच्छ भिवंडी, सुंदर भिवंडी हे बिरुद मिळविण्यास मनपा प्रशासन ऐन दिवाळीत अपयशी ठरले असून महापालिकेने राबविलेली स्वच्छ आणि हरित दिवाळी साजरी करण्या संदर्भातील स्वाक्षरी मोहीम देखील पुरता फोल ठरली आहे.