ठाण्यातील ८५ वर्षांपुढील मतदारांसह दिव्यांगांकडून गृहमतदानास अल्प प्रतिसाद
By सुरेश लोखंडे | Published: May 10, 2024 08:51 PM2024-05-10T20:51:36+5:302024-05-10T20:52:01+5:30
फक्त ३०० जणांचे मतदान.
ठाणे : यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यापैकी ८५ वर्षे व त्या पुढील जेष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या गृहमतदानाला गुरूवारपासून ठाणे लाेकसभा मतदारसंघात सुरूवात झाली. या मतदारसंघात २७ हजार ३२५ जेष्ठ नागरिक मतदार आहे. पण त्यापैकी अवघ्या २६२ मतदारांनी गृहमतदानाला पसंती दिली आहे. तर एक हजार ९५२ दिव्यांगांपैकी फक्त ३८ मतदारांनी गृहमतदान केले आहे. त्यामुळे गृहमतदानाची संधी असूनही जेष्ठ नागरिक व दिव्यांगांकडून त्यास फारसा प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे उघड झाले आहे.
या गृहमतदानाला प्रारंभ हाेताच पहिल्या दिवशी सायंकाळपर्यत ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २६२ नागरिकांनी तर ३८ दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली. तसे या लाेकसभा मतदारसंघात ८५ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या- १५ हजार २१ , महिला मतदारांची संख्या १२ हजार ३०४ इतकी आहे. तर ४० टक्के अपंगत्व व ८५ वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना भरुन घरुनच मतदान करुन देण्याची सुविधा निवडणूक आयाेगाने उपलब्ध करून दिली आहे. ज्या जेष्ठ इच्छुक मतदारांनी लोकसभा निवडणूकची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे हा १२ डी फॉर्म भरुन दिले त्यापैकी पात्र मतदारांनी आज टपाली मतपत्रिकेद्वारे आज आपला मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभानिहाय जेष्ठांचे गृहमतदान -
या ठाणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात आज या जेष्ठ नागरिकांनी व दिव्यांगांनी मिळून ३०० जणांनी गृहमतदान केले. त्यापैकी मिरा-भाईंदर ३४ जेष्ठ मतदार व तीन दिव्यांगांनी गृहमतदान केले. याप्रमाणेच ओवळा माजिवडा ४६ जेष्ठांचे तर १६ दिव्यांगांचे गृहमतदान झाले. काेपरी पाचपाखाडीत २२ जेष्ठ आणि चार दिव्यांग, ठाण्यात १०३ जेष्ठ आणि दाेन दिव्यांग तर ऐरोलीत १८ जेष्ठ मतदार आणि चार दिव्यांगांनी मतदान केले. याप्रमाणेच बेलापूरला ३९ जेष्ठांनी आणि नऊ दिव्यांगांनी गृहमतदान केले आहे.