निष्ठावंतांना डावलले; सेनेत बंडाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:12 AM2017-08-09T06:12:59+5:302017-08-09T06:12:59+5:30
कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत, सुशिक्षित कार्यकत्यांना डावलून आयारामांच्या घरातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अनेक ठिकाणी बंडाचा झेंडा फडकावण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत, सुशिक्षित कार्यकत्यांना डावलून आयारामांच्या घरातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अनेक ठिकाणी बंडाचा झेंडा फडकावण्यात आला आहे. प्रभाग १२ व १३ मधील पदाधिकाºयांनी राजीनाम्याचा इशारा दिला असून काहींनी राजीनामा दिल्याची चर्चा असल्याने निवडणुकीपूर्वीच ‘जय महाराष्ट्र’ची ललकारी ऐकू येऊ लागली आहे.
सर्वधर्मसमावेशक आणि सर्वाधिक मराठी उमेदवारांना संधी दिल्याचा दावा शिवसेनेतर्फे केला जात असला तरी अनेक वर्षे निष्ठेने काम करणाºयांना उमेदवारीपासून रोखणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा डावललेल्या कट्टर शिवसैनिकांत सुरु आहे. सुरुवातीला उमेदवारी देतो असे सांगून ऐनवेळी इतर पक्षातून शिवसेनेत आलेल्या पर्यायी दावेदाराला उमेदवारी दिल्याने अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. वरिष्ठ स्तरावरुन या शिवसैनिकांची समजूत काढली जात असली, तरी यातील बहुसंख्यांनी पक्षातील या आयारामांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय गेतला आहे.
शिवसेनेत कालपरवा आलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा मोठे झालेत का? अशी तिखट प्रतिक्रिया उमटू लागली आहे. काही प्रभागांत तर आयारामांनी शिवसैनिकांनी विश्वासात न घेताच प्रचारालाही सुरुवात केल्याने सेनेत कुरबुरीने डोके वर काढले आहे. सेनेतील निष्ठावंतांना डावलून फक्त आर्थिक कुवतीच्या जोरावर प्रचार केला जात असेल; तर अशा उमेदवारांना आम्ही सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतल्याने धुसफूस सुरु आहे. आम्ही बाळासाहेबांच्या पक्षासाठी काम करतो. कोणा आयारामांसाठी नाही, असे उघडउघड इशारे सुरू झाले आहेत.
शिवसेनेतही सुशिक्षित कार्यकर्ते आहे. त्यांचाही जनसंपर्क व लोकसेवा दांडगी असतानाही त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्याची खदखद बाहेर पडून लागली आहे.
काही प्रभागात एखाद्या आयारामाला संधी देणे ठिक आहे. पण या आयारामांच्या एकाच घरात दोन, तीन, पाच सदस्यांना उमेदवारी देणे, हे निष्ठावंतांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची तीव्र भावना व्यक्त होऊ लागली आहे.
त्यामुळे प्रभाग १२ व १३ मधील पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा सुरु आहे. प्रभाग १२ मधील शाखाप्रमुख प्रवीण कृष्णा उतेकर, उपविभागप्रमुख विशाल मोरे व रवींद्र शिवाजी चिल्ले, उपशाखाप्रमुख सुनील बेनके, गटप्रमुख कमलेश इंदुलकर व दीपक निकम, प्रभाग १३ मधील विभागप्रमुख प्रकाश मोरे, उत्तर भारतीय सेलचे विभागप्रमुख रामअवतार आदींचा समावेश आहे. प्रभाग १२ मधील विभागप्रमुख संदीप भोसले यांनी तर शिवसेना सोडून विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम परिषदेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेतील हे बंड झपाट्याने पसरू लागले आहे.
मी शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा सैनिक आहे. कारगिल युद्धातील निवृत्त अधिकारीसुद्धा आहे. माझा जनसंपर्क दांडगा असतानाही एक सुशिक्षित उमेदवार म्हणूनही माझा विचार झाला नाही. याउलट इतर पक्षांतुन आलेल्यांना उमेदवारी दिल्याने मी शाखाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
- प्रवीण उतेकर, प्रभाग १२ मधील शाखाप्रमुख
शिवसेनेत जे नाराज असतील त्यांची समजूत काढली जात आहे. अद्याप कोणीही पदाचा राजीनामा दिलेला नाही. नाराजांशी वरिष्ठ नेते व्यक्तिश: चर्चा करीत आहेत. ते त्यांची नाराजी दूर करतील. लवकरच शिवसेनेतील सर्वच निष्ठावंत पक्षाला बहुमत मिळवून देण्यासाठी एकत्रित काम करतील. - धनेश पाटील,
शिवसेना शहरप्रमुख