एलआरटी प्रकल्पात आहे पार्किंग सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:37+5:302021-07-10T04:27:37+5:30
ठाणे : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गात ठाण्यात कुठेही पार्किंगच्या सुविधेचा विचार केला नसला तरी ठाणे ...
ठाणे : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गात ठाण्यात कुठेही पार्किंगच्या सुविधेचा विचार केला नसला तरी ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या अंतर्गत मेट्रो अर्थात एलआरटीच्या मार्गात पार्किंग सुविधेच्या व्यवस्थेचे प्रयोजन केल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. यामध्ये लोकमान्यनगर, रायलादेवी, हॅप्पी व्हॅली आणि नवीन ठाणे स्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे ठामपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ठाण्यात अंतर्गत मेट्रोऐवजी याच मार्गावर एलआरटी (लाइट रेल ट्रान्झिस्ट)चा प्रकल्प पुढे आणला आहे. यासाठी ७ हजार १६५ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, तो अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता; परंतु राज्य शासनाने यात काही शंका उपस्थित केल्याने त्याचा ठामपाकडून खुलासा करण्यात येत आहे. मेट्रोप्रमाणे एलआरटीदेखील सुरुवातीचे तीन कि.मी. भूमिगत आणि पुढे एलिव्हेटेड पद्धतीने धावणार आहे. २९ कि.मी.चा मार्ग असणार असून, यामध्ये २२ स्टेशन आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता यामध्ये असणार असून, याचा वेग मेट्रोपेक्षा २० टक्के कमी असणार आहे; परंतु ठाणेकरांना सुखकर प्रवासाची हमी या माध्यमातून दिली जाणार आहे. अंतर्गत मेट्रोसाठी सुमारे १३ हजार कोटी ९५ लाखांचा खर्च अपेक्षित होता; परंतु आता एलआरटीसाठी हाच खर्च ७ हजार १६५ कोटींपर्यंतच असल्याने तब्बल प्त्तच् हजार ९३० कोटींची बचत होणार आहे.
या प्रकल्पात नवीन ठाणे स्थानक, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस आगार, शिवाईनगर, नीळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटर फ्रंट, पातलीपाडा, आझादनगर बस थांबा, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुमनाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक आणि ठाणे जंक्शन अशी २२ स्थानके असणार आहेत. यापैकी नवीन ठाणे स्थानक आणि ठाणे जंक्शन ही दोन स्थानके भूमिगत आहेत, तर उर्वरित २० स्थानके उन्नत आहेत.
महापालिका हद्दीत पुरेशी वाहनतळे नाहीत. ठाणे स्थानक परिसरात वाहनतळांची सुविधा असली तरी ती अपुरी पडू लागली आहेत. यातूनच गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्यात येत आहे. पुरेशी वाहनतळे नसल्यामुळे नागरिक रस्त्यांवर वाहने उभी करीत असून, यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. प्रस्तावित असलेल्या अंतर्गत एलआरटी स्थानकांच्या परिसरात वाहनतळांअभावी वाहतूककोंडी होऊ शकते. स्थानक ते घर असा प्रवास करण्यासाठी नागरिक स्वत:च्या वाहनांचा वापर करतील. ही वाहने उभी करण्यासाठी स्थानक परिसरात वाहनतळ असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानकांच्या परिसरात वाहनतळ उभारणीचा विचार यापूर्वीच केला असून, त्यानुसार काही ठिकाणी जागाही निश्चित केल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.